महाराष्ट्र गोसेवा आयोगातील अशासकीय सदस्यांची संख्या तात्काळ वाढवावी — गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची मागणी
परभणी प्रतिनिधी
महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये संचालक आणि अशासकीय सदस्यांची संख्या तात्काळ वाढवावी, तसेच आयोगाची रचना अधिक व्यापक करावी, अशी मागणी गौरक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात गौरक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन विभागाचे मंत्री, तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगातील सदस्यांची संख्या 18 ते 21 करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून किंवा प्रत्येक दोन जिल्ह्यांमधून एक सदस्य नियुक्त करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये स्वतंत्र उपाध्यक्ष पद नव्याने निर्माण करावे, तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोसेवा आयोगाचा एक प्रतिनिधी नियुक्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गोसेवक, गौरक्षक, गोसंरक्षण संस्था, गोशाळा आणि गोशाळा चालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आयोगाची रचना अधिक सक्षम आणि व्यापक करण्याची गरज असल्याचे गौरक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आयोगामध्ये सदस्यसंख्या वाढवून विभागनिहाय आणि जिल्हानिहाय प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी गौरक्षक सेना महाराष्ट्र प्रदेश मंत्री तथा कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केली.
यावेळी भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज उखळीकर, गौरक्षक सेना मराठवाडा विभागीय अध्यक्ष, 1008 महामंडलेश्वर सचितानंद सरस्वती अशोक महाराज पवार, गौरक्षक सेना मराठवाडा वरिष्ठ उपाध्यक्ष, योगगुरू चंपालाल देवतवाल ठाकूर, गौरक्षक सेना मराठवाडा प्रचारक, अॅड. निवृत्ती कदम, गौरक्षक सेना जिल्हा कार्यकारणी सदस्य, तसेच गोपाळा गोसेवक आणि गौरक्षक यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या मागण्यांबाबतचे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागासह संबंधित केंद्रीय विभाग आणि गोसेवा आयोगाकडेही पाठवण्यात आल्याची माहिती नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकारांना दिली.
गोसेवा, गोसंवर्धन आणि गोशाळांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोग अधिक सक्षम करण्याची मागणी आता प्रशासनाकडे करण्यात आली असून, या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते, याकडे गोसेवक आणि गौरक्षकांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या