उपनिबंधक कार्यालयाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा गणेशराव रोकडे यांनी केली आहे.

 


उपनिबंधक कार्यालयाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा गणेशराव रोकडे यांनी केली आहे.


पालम प्रतिनिधी:-पालम तालुक्यातील वाडी खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्यत्व उपनिबंधक कार्यालयाने रद्द केले होते. मात्र, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी १३ जुलै २०२६ रोजी तो निर्णय रद्द करत गणेशराव रोकडे यांचे सदस्यत्व कायम ठेवले आहे.

याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गणेशराव रोकडे यांनी आरोप केला की, चुकीच्या निर्णयामुळे त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवण्याची संधी गमवावी लागली. या निर्णयामुळे त्यांचे राजकीय आणि मानसिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.

रोकडे यांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीचे सदस्यत्व रद्द करण्यामागे राजकीय आकस होता. त्यांनी या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी उपनिबंधकांचा निर्णय बेकायदेशीर ठरवत तो रद्द केला आणि सदस्यत्व पूर्ववत कायम ठेवले.

दरम्यान, सदस्यत्व पुन्हा बहाल झाले असले तरी, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सदस्यत्व रद्द झाल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही आणि निवडणुकीत सहभागी होण्याची संधी गमावल्याचेही त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणामुळे आपल्याला मानसिक, सामाजिक आणि राजकीय नुकसान झाल्याचा दावा करत, संबंधित उपनिबंधक कार्यालयाविरोधात उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे गणेशराव रोकडे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या