शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर परीक्षा; ऑक्टोबरमध्ये होणार आयोजन
परळी प्रतिनिधी :- केंद्रस्तरावरील परीक्षा ४ ऑक्टोबरला, तालुकास्तरावरील परीक्षा १८ ऑक्टोबरला, तर जिल्हास्तरावरील परीक्षा २५ ऑक्टोबरला
शैक्षणिक सहलीसाठी गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या उद्देशाने केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्ता व कौशल्याच्या आधारे पुढील स्तरावर जाण्याची संधी मिळणार आहे.
केंद्रस्तरावरील परीक्षा ४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, या परीक्षेत सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी व उपयोजनात्मक स्वरूपाची असेल. परीक्षेत ५० प्रश्न असून एकूण १०० गुण असतील.
तालुकास्तरावरील परीक्षा १८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या परीक्षेत वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी व उपयोजनात्मक स्वरूपाचे ७५ प्रश्न विचारले जातील. त्यासाठी ७५ गुण निर्धारित करण्यात आले आहेत. याशिवाय २५ गुणांचा एक निबंधही असेल. प्रत्येक केंद्रातून गुणवत्ताक्रमानुसार प्रथम दहा विद्यार्थ्यांची निवड तालुकास्तरावरील परीक्षेसाठी करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेत ७५ गुणांची वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी व उपयोजनात्मक परीक्षा आणि २५ गुणांचा निबंध असे स्वरूप असेल. अशा प्रकारे परीक्षेचे एकूण गुण १०० असतील.
जिल्हास्तरावरून शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ताक्रमानुसार करण्यात येणार आहे. इयत्तानिहाय किंवा सहलीच्या प्रकारानुसार पात्र विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. इयत्ता/सहलीच्या प्रकारानुसार तालुकास्तरावरील गुणवत्ताक्रमातील प्रथम तीन विद्यार्थ्यांमधून इस्रो सहलीसाठी एकूण ३३ विद्यार्थी, तर नासा सहलीसाठी तालुकास्तरावरील गुणवत्ताक्रमातील प्रथम विद्यार्थ्यांमधून एकूण ११ विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी पात्र राहतील.
या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, उपयोजनात्मक ज्ञान आणि लेखनकौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.




0 टिप्पण्या