पालम तालुक्यातील सोमेश्वर फळा शिवारात भीषण आगीत 100 एकर ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

 पालम तालुक्यातील सोमेश्वर फळा शिवारात भीषण आगीत 100 एकर ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान 

पालम प्रतिनिधी    पालम तालुक्यातील फळा व सोमेश्वर लगतच्या शिवारात आज दिनांक 6 मार्च रोजी दुपारी अंदाजे एक वाजे दरम्यान आग लागल्यामुळे या शिवारातील शंभर एकर च्या आसपास ऊस जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली आहे.

 ही आग एवढी भीषण होती की येथील स्थानिक पन्नास-साठ शेतकऱ्यांना आग आटोक्यात येत नसल्यामुळे गंगाखेड येथील अग्निशमन दलास बोलवावे लागले. पालम तालुक्यात गोदावरी नदी किनारी उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते व छोट्यामोठ्या आगीच्या घटना दरवर्षी घडत असतात

 पण यावेळेस अंदाजे तब्बल 100 एकरवरील उस जळाल्याची घटना  परिसरात  पहिल्यांदाच घडत आहे .दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सोमेश्वर शिवारातील 25 एकर व फळा शिवारातील 75 एकरातील ऊस भस्मसात झाल्याचे दिसून येत आहे.

आग एवढी भयानक होती की वेळीच अग्निशामन दल बोलावल्यामुळे पुढील शेतातील अंदाजे दोनशे एकर वरील ऊस वाचल्याचे शेतकरी सांगत आहेत. या दुर्घटनेत अंदाजे 50 शेतकऱ्यांचा शेतातील ऊस जळून खाक झाल्यामुळे प्रत्येकाचे लाखोचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

 दरम्यान दुपारी साडे चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आल्याचे  दिसून येत होते, परंतु ऊसातील वाळलेल्या पाचटामुळे जर जोराचा वारा सुटल्यास अजूनही आगीचा धोका उद्भवण्याची भिती उपस्थित शेतकरी करत आहेत.

    घटनास्थळी पालम पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी वेळीच धाव घेत शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून अद्यापही महसूल प्रशासनातील एकही अधिकारी अथवा कर्मचारी तेथे उपस्थित नसून त्यांनी या मोठ्या दुर्घटनेची दखल न  घेतल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या