पालम तालुक्यातील पुयणी, आडगाव आणि वनभुजवाडी या गावांना जोडणारा बनला मृत्यूचा सापळा
पालम प्रतिनिधी:-
पालम तालुक्यातील पुयणी, आडगाव आणि वनभुजवाडी या गावांना जोडणारा महाराष्ट्र राज्य महामार्ग एसएच-४४४ सध्या नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र समोर आले आहे.हा रस्ता आधीपासूनच अरुंद असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच पुयणी गावाजवळील नाला पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पुलावर पाणी साचत आहे. त्यामुळे पाण्याखालील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती वाढली आहे.
पुढे पुयणी गावातून जाणाऱ्या रस्त्याची परिस्थितीही अत्यंत बिकट आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्या गाळाने पूर्णपणे भरल्या आहेत. सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर घसरून पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तरीही संबंधित प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आडगाव परिसरातही परिस्थिती वेगळी नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि सांडपाणी यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यालगत पानटपऱ्या, जनावरांचे गोठे तसेच अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे.
याशिवाय, शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते योग्य प्रकारे दुरुस्त न केल्याने अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
वनभुजवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे असून रस्त्याच्या कडेला जनावरे बांधली जात असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील अनेक दिशादर्शक फलकही गायब झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, नाल्यांची साफसफाई, अतिक्रमण हटविणे, दिशादर्शक फलक बसविणे आणि रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.
या गंभीर समस्येकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी वेळेत लक्ष देतील का, की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतील, हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




0 टिप्पण्या