ग्रामपंचायत निवडणुकांची तयारीराज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या कार्यक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला असून, २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
परभणी जिल्हा प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, भारत निवडणूक आयोगाकडून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR-2026 अंतर्गत मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण सुरू आहे.
यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
पूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २४ जुलै २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्यानंतर हरकती आणि सूचना स्वीकारून अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते.
मात्र, अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना केली होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी मोजक्याच ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आहेत.
ही वस्तुस्थिती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीचा विचार करून आयोगाने २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी सध्या प्रसिद्ध करू नये, असे आदेश दिले आहेत.
तसेच, सुधारित मतदार यादीचा नवीन कार्यक्रम आणि पुढील सूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याची तयारी करणारे इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि मतदारांनी सध्या कोणताही संभ्रम बाळगू नये.
राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच मतदार यादीसंबंधी पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
ही माहिती राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रावर आधारित आहे.



0 टिप्पण्या