जात पडताळणी समिती कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा महादेव कोळी समाजाचा ठाम निर्धार.
पालम प्रतिनिधी:-मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाने जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती क्रमांक १ ला येत्या १० ऑगस्ट रोजी प्रतिकात्मक टाळे ठोक आंदोलन करण्याचा निर्धार समाजाच्या बैठकीत करण्यात आला आहे.
समाजाच्या प्रतिनिधींचा आरोप आहे की, मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातींच्या पडताळणीदरम्यान ब्रिटिशकालीन, निजामकालीन संदर्भ, गॅझेट, जनगणना आणि संशोधनपर ग्रंथांचा पुरेसा विचार केला जात नाही. त्याऐवजी केवळ जुन्या "कोळी" नोंदींचा आधार घेत अनेक प्रकरणे अवैध ठरवली जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
महादेव कोळी आणि मल्हार कोळी या अनुसूचित जमातींचा समावेश अनुक्रमे अनुसूचित जमातींच्या यादीत क्रमांक २९ आणि ३० वर आहे. समाजाच्या म्हणण्यानुसार, पुणे, ठाणे, नाशिक, नगर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या "कोळी" नोंदींवर वैधता प्रमाणपत्रे दिली जातात. मात्र, मराठवाड्यातील प्रकरणांमध्ये वेगळे निकष लावले जात असल्याने भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वी मे महिन्यात समाजाच्या वतीने १४ दिवसांचे अन्नत्याग उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी जात पडताळणी समितीला ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, या कालावधीनंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने आता १० ऑगस्ट रोजी प्रतिकात्मक टाळे ठोक आंदोलन करण्याचा निर्णय समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
परभणी आणि बीड जिल्ह्यातील झालेल्या या बैठकीत समाजातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. तसेच १० ऑगस्टच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, या आरोपांवर जात पडताळणी समितीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.



0 टिप्पण्या