रोजगार सहाय्यकांचा इशारा : मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून काम बंद आंदोलन

 रोजगार सहाय्यकांचा इशारा : मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून काम बंद आंदोलन



पालम (प्रतिनिधी) — महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना, पालम (जि. परभणी) यांच्या वतीने पंचायत समिती प्रशासनाला निवेदन देत विविध शासकीय निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिल २०२६ पासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, रोजगार सहाय्यक शासकीय विविध योजना प्रामाणिकपणे राबवत आहेत. मात्र नव्याने लागू करण्यात आलेली मॉनिटरिंग प्रणाली, ई-केवायसी (EKYC) तसेच इतर अतिरिक्त कामे अल्प कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कामांसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, अशी तक्रार संघटनेने केली आहे.

तसेच दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रोजगार सहाय्यकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्याचा कामकाजावर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेने प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा संघटनेच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०२६ पासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हे निवेदन तालुका अध्यक्ष राजधर भिमराव भोसले यांच्या स्वाक्षरीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पालम यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या