झेड.पी. शाळा ढवळकेवाडी येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती हर्षोल्हासात साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत प्रेरणादायी कार्यक्रम
गंगाखेड प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, ढवळकेवाडी येथे आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळच्या परिपाठानंतर आयोजित या कार्यक्रमास शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री. रावसाहेब चंदे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ढवळकेवाडी गावाचे प्रथम नागरिक व युवा सरपंच श्री. अशोक राठोड, तसेच उपसरपंच, गंगाखेड येथील बांधकाम गुत्तेदार श्री. मुनीरभाई व श्री. राजूभाई उपस्थित होते. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. भास्कर फड, विद्यार्थीप्रिय शिक्षिका श्रीमती गित्ते मॅडम तसेच शालेय कर्मचारीही कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, हार अर्पण व श्रीफळ फोडून अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रस्नेही पदवीधर शिक्षक श्री. केशवराव सोनवणे यांनी केले, तर अभ्यासपूर्ण व बहारदार सूत्रसंचालन श्री. महादेव जाधव यांनी केले.
या प्रसंगी जिजाऊमाता व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला.
युवा सरपंच श्री. अशोक राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेस सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच लवकरच सर्वसोयींनी युक्त नवीन स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आपली शाळा जिल्ह्यातील नंबर वन मॉडेल शाळा बनवूया,” असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री. रावसाहेब चंदे यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळा स्वच्छ, सुंदर व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद श्री. भास्कर फड, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. महादेव जाधव, श्री. विनोद बडे, श्री. माधव लातुरे तसेच इयत्ता ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. आभारप्रदर्शन श्री. श्रीकांत शिंदे गुरूजी यांनी केले.
कार्यक्रमानंतर मान्यवरांना फराळ व चहा, तर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, प्रेरणा व शैक्षणिक मूल्यांनी परिपूर्ण ठरला.






0 टिप्पण्या