बीड शहरात टँकर लॉबी सुरू करायची आहे काय? - एस.एम.युसूफ़

 बीड शहरात टँकर लॉबी सुरू करायची आहे काय? - एस.एम.युसूफ़



बीड प्रतिनिधी :- शहरातील बीड नगर परिषदेने घेतलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद पडलेल्या बोअर्स यावेळी दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईपासून वाचविण्यासाठी पुनरुज्जीवित करणे आवश्यक असताना बोअरच्या जागी काँक्रिटीकरण करून बुजवण्यात आले आहे. यामुळे बीड शहरात टँकर लॉबी सुरू करायची आहे काय? असा प्रश्न मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.

या विषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, गेल्या वर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या उन्हाळ्यात बीड शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ येऊ नये व त्यावर कोट्यावधी रुपयांचा चुराडा होऊ नये. याकरिता पाण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी बीड नगर परिषदेने बीड शहरात जवळपास प्रत्येक प्रभाग व वार्डात घेतलेले बोअर्स जे नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे देखरेख व डागडूजी अभावी बंद पडलेले आहेत. ज्यामध्ये काही बोअर्सवर हातपंप तर काही बोअर्सवर सबमर्सिबल मोटर सुद्धा लावलेल्या आहेत परंतु याकडे बीड नगर परिषदेचे साफ दुर्लक्ष झाल्याने ते सध्या बंद अवस्थेत पडून आहे. निदान यावेळी उन्हाळ्यात तरी हे बोअर्स पूर्ववत सुरू करून पुनरूज्जीवीत करणे आवश्यक आहे. जेणेकरून बीड शहरवासीयांना पाणी पंचाई पासून काही प्रमाणात का होईना वाचविता येईल व पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ येणार नाही. पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होऊ नये. नागरिकांवर पाणीबाणीची वेळ येऊ नये. सध्या नळांना १५ ते २५ दिवसाआड पाणी सोडले जात असतानाही बीड नगर परिषद या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. उलट घेतलेले बोअर्स काँक्रीटीकरण करून बुजवण्यात आले आहे. ज्या बोअर च्या जागी काँक्रिटीकरण केले ते बीड नगर परिषदेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शहरातील थोरातवाडी परिसरात आहे. सदरील बोअर काही महिन्यांपूर्वी पर्यंत सुरू होते मात्र सबमर्सिबल मोटार बिघडल्याने त्याची देखभाल न करता बंद अवस्थेत सोडून देण्यात आले होते. काही दिवसापूर्वी हे बोअर डमी न लावता काँक्रीटीकरण करून बंद करून टाकण्यात आले. विशेष म्हणजे या बोअरच्या पाईपलाईन मध्ये नळांना पाणी देणारी तलावाची पाईपलाईन जोडलेली आहे. यामुळे जेव्हा तलावाचे पाणी सोडले जाते तेव्हा या डमी विना बंद केलेल्या बोअर मधून पाणी नालीत वाहू लागले आहे. बीड शहरात निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन याविषयी बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ रोजी "बीड नगर परिषदेने घेतलेल्या परंतु बंद अवस्थेत असलेल्या बीड शहरातील सर्व बोअर्स पूर्ववत सुरू करणे तसेच शहरातील खाजगी विहीर व बोअर्सचे अधिग्रहण करणे" याकरिता बीडच्या जिल्हाधिकारी, बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि बीड तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे. यावर कारवाई न करता निवेदन दिल्यानंतर आठ दिवस होत नाही तोच थोरातवाडी येथील बोअरचे पाईप कापून काँक्रीटीकरण करून बुजवून टाकण्यात आले आहे. आवश्यक तेवढ्या प्रमाणात बीड शहरवासीयांना पाणी मिळेना. बीड नगर परिषदेकडून १० ते २५ दिवसाआड नळांना पाणी सोडले जात आहे. शहरात सुरू असलेल्या पाणी टंचाईचे गांभीर्य बीड नगर परिषद प्रशासनाला असल्याचे दिसून येत नाही. यावरून बीड नगर परिषदेला शहरात टँकर लॉबी तर सुरू करायची नाही ना असा प्रश्न मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या