बॉण्ड व तिकीट विक्रेते, डीटीपी व लॅमिनेशनवाल्यांना दरपत्रक लावणे बंधनकारक करा - एस.एम.युसूफ़
बीड प्रतिनिधी - येथील तहसील कार्यालयाच्या आवारात बॉण्ड व तिकीट विक्रेते आणि समोरील डीटीपी व लॅमिनेशनवाल्यांकडून ग्राहकांची अडवणूक होत असून आर्थिक लूट केली जात आहे. ती थांबविण्याकरिता येथे दरपत्रक लावणे बंधनकारक करावे अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड तहसील कार्यालयाच्या आवारात बसणारे बॉण्ड व तिकीट विक्रेते आणि तहसील समोरील झेरॉक्स आणि लॅमिनेशनवाल्यांनी ग्राहकांची आर्थिक लूट सुरू केली आहे. लूट करणाऱ्यांनी माणुसकी सोडली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे व्यापारी मस्त झाले असले तरी ग्राहक मात्र त्रस्त झाले आहेत. उद्योग करणाऱ्यांनी व्यवसाय करताना कुठलेही तारतम्य ठेवले नाही. मनाला येईल त्याप्रमाणे दर आकारणी करायची आणि ती अडवणूक करून ग्राहकांकडून वसूल करायची. असा शिरस्ता येथे सुरू करण्यात आला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात बसलेले बॉण्ड व तिकीट विक्रेते बॉण्ड व तिकीटांवरील मुद्रित किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन बॉण्ड व तिकीटांची विक्री करू लागले आहेत. तिकीट विक्रीमध्ये तर इथे ५ रुपये किमतीचे तिकीट चक्क दाम दुप्पट दराने म्हणजेच १० रुपयात विक्री केले जात आहे. इतर तिकिटांमागेही दीडपट किंवा दुपटीने रक्कम घेऊन तिकीट दिले जात आहे. हे कमी होते की काय म्हणून तहसील समोरील झेरॉक्स सेंटरवाल्यांनीही डीटीपी करून देण्याचे दर अव्वाच्या सव्वा करून टाकले आहे. ए-४ चा एक कागद टाईप करून द्यायचं म्हणल्यावर हे ८० ते १०० रुपये घेऊ लागले आहेत. एवढेच नाही तर कुणी मोबाईलवर टाईप केलेल्या मजकुराची किंवा डीटीपी केलेल्या कागदाची प्रिंट काढून द्या व त्यास लॅमिनेशन करून द्या म्हणून सांगितले तर त्याचेही १०० रुपये वसूल करू लागले आहेत. अशाप्रकारे तहसीलच्या आवारातील बॉण्ड व तिकीट विक्रेते आणि समोरील झेरॉक्स व डीटीपी दुकानवाल्यांनी अक्षरशः लूट चालविली आहे. या अवस्थेमुळे यांच्याकडून अधिकारी हप्ते तर घेत नाहीत ना? विक्रेत्यांकडून येथे बसायचे भाडे वसूल केले जाते की काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याविषयी काही बॉण्ड व तिकीट विक्रेते म्हणत आहेत की, आम्हाला औरंगाबादहून आणावे लागत आहेत म्हणून महाग विकावे लागत आहे. ते काहीही असो ग्राहकांची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्याकरिता येथे दरपत्रक ठळक अक्षरात लावणे बंधनकारक व सक्तीचे करावे. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली.



0 टिप्पण्या