मल्टीपर्पज मैदान लोकांच्या व्यायामासाठी की मोटारसायकलींसाठी?
अधिकाऱ्यांनो, मैदानात भांडणं होऊन वातावरण बिघडण्याची शक्यता!
बीड प्रतिनिधी :- मल्टीपर्पज मैदान चालणे व धावणे याकरिता मैदानात येणाऱ्या लोकांच्या व्यायामासाठी आहे की मोटारसायकलींसाठी? असा प्रश्न आता येथे येणाऱ्यांना पडू लागला आहे. कारण मोठ्या संख्येने दुचाकी स्वार दुचाकींसह मैदानात येवून व्यायाम करणाऱ्यांना कट्स मारू लागले असून एवढ्यावरच न थांबता भरधाव मोटरसायकली चालवून कर्णकर्कश पद्धतीने हॉर्नही वाजवू लागले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनो, मैदानात भांडणं होऊन वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा वेळीच उपाय करा असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, निजामकालीन बहुविध प्रशाला अर्थातच मल्टीपर्पज हायस्कूल ही ऐतिहासिक शाळा काही वर्षांपूर्वी नेस्तनाबूत झाली. त्याच जागेवर शहरातील नागरिकांना चालण्यासाठी व धावण्यासाठी अर्थातच व्यायामासाठी छत्रपती संभाजी महाराज मैदान तयार करण्यात आले. शहराच्या मध्यवस्तीत असल्याने ह्या मैदानावर येऊन चालणाऱ्या व धावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे येणाऱ्यांमध्ये लहान मुलामुलींपासून ते तरुण व वयस्क स्त्री-पुरुष सुद्धा मोठ्या संख्येने सकाळी व संध्याकाळी येथे येवून दोन वेळेस चालणे व धावणे करू लागले आहेत. या मैदानाच्या निर्माणानंतर काही काळ येथे गेटच्या आत मोटार सायकली घेऊन जाण्यास प्रतिबंध होता मात्र आता सगळे काही सैल झाल्याचे या मैदानात सकाळ व संध्याकाळी आल्यानंतर सहज दिसून येते. आता येथे सकाळची वेळ असो की, संध्याकाळची. काही वात्रट व आपल्या बापजादांच्या पैशांवर मोटर सायकली उडविणारे तरुण मोटरसायकली गेट बाहेर न लावता थेट मैदानात घेऊन येत आहेत. एकदा अशांच्या मोटरसायकली मैदानात आल्या की त्यांना व त्यांच्या मोटरसायकलींना पाहून अनायासे लोकांच्या तोंडून त्या मंत्र्यांसारखे 'काय ते डोंगर, काय ते रस्ते' वगैरे सारखे संवाद रागात निघत आहेत आणि ते म्हणू लागले, 'काय त्या मोटरसायकली, काय ती वात्रट मुलं, काय ती गती अन् काय ते हॉर्न वगैरे. या परिस्थितीमुळे या मैदानात एखाद्या दिवशी मध्ये मोटर सायकली घेऊन शिरणाऱ्या व फिरविणाऱ्या वात्रट मुलांसोबत पायी चालणारे व धावणाऱ्यांचे भांडण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे झाल्यास शहरातील वातावरण खराब होऊ शकते. तेव्हा ही बाब लक्षात घेता कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्याधिकारी नीता अंधारे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जातीने या मैदानाकडे लक्ष द्यावे आणि या मैदानाच्या गेटच्या आत मोटरसायकली येऊ नये यासाठी कडक प्रतिबंध घालावे. मल्टीपर्पज मैदान पायी चालणाऱ्यांसाठी व धावणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे. परंतु आता या मैदानात मोटारसायकलस्वार पायी चालणाऱ्यांना कट्स मारून भरधाव वेगात मोटरसायकली पळवीत आहेत. याची तक्रार इथं येणाऱ्या बहुतेक महिला आणि पुरुषांनी केलेली असून एक तर या मैदानात येणाऱ्या मोटरसायकलींचे मध्ये येणे बंद करा किंवा हे मैदान पायी चालणाऱ्यांसाठी व धावणाऱ्यांसाठी नव्हे मोटरसायकलवाल्यांसाठी आहे असे घोषित करा असेही आता लोकं रागाने बोलू लागले आहेत. जर कोणी मोटरसायकल घेऊन मध्ये आलाच तर त्याच्याकडून दंड रुपात किमान ०५ हजार रुपये वसूल करावे. म्हणजे या प्रकाराला आळा बसेल असे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून नमूद केले आहे.

0 टिप्पण्या