गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळापालम तालुक्यातील सिरपूर जिल्हा परिषद शाळेस भेट

गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा
पालम तालुक्यातील सिरपूर जिल्हा परिषद शाळेस भेट

पालम : तब्बल एक किलोमीटर अंतराचा चिखल तुडवत गटविकास अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांनी सिरपूर (ता.पालम) जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. तदनंतर विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासनही दिले. 
सिरपूर जिल्हा परिषद शाळेचा हजरीपट 45 वरून 82 वर गेलाय. येथील पटसंख्या, वर्ग खोल्या आणि शाळेच्या अडी-अडचणी पाहण्यासाठी गटविकास अधिकारी उदय शिसोदे, गटशिक्षणाधिकारी ए.ए. सय्यद, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रेय निलपत्रेवार यांनी शाळेला भेट देण्यासाठी निघाले. परंतु रस्त्याअभावी त्यांना १ किलो मीटर अंतरावर वाहन सोडावे लागले. येथून चिखल तुडवीत पायी शाळा गाठावी लागली. शाळेत येतात त्यांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात गेले. त्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, वर्ग खोल्यांची संख्या, शिक्षक संख्या जाणून घेतली.  दरम्यान, विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांची गुणवत्ता देखील तपासली. तदनंतर शिक्षक, पालक यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, श्री. सय्यद यांनी देखील पाचवीच्या वर्गास भेट दिली. तसेच श्री. शिसोदे यांनी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या खोलीत जाऊन आहाराची गुणवत्ता पाहिली. मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांची प्रत्यक्षात पाहणी केली. जवळपास एक तास ते शाळेत होते. त्यांना पालकांनी शिक्षकांची मागणी केली. दोनच शिक्षकांवर सात वर्गाची जबाबदारी असल्याची जाणीव पालकांनी अधिकाऱ्यांना करून दिली. शिवाय, शाळेला तीनच वर्गखोल्या असल्याचे देखील शालेय समितीने सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनी आगामी आठवड्यात दोन शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. शिवाय, खोल्यांसाठी देखील पाठपुरावा करण्यात येईल, अशी देखील पालकांना सांगितले. पहिल्यांदाच एवढे अधिकारी शाळेला भेट देण्यास आल्याने गावकरी आनंदीत झाले. यावेळी शिक्षक सुशील चव्हाण, नागनाथराव शेवटे, मारोती लांडे, स्वाती नागनाथ लांडे, शालेय समिती अध्यक्षा गोदावरी शेवटे, उपाध्यक्ष भागवत लांडे, बालाजी दुधाटे, बालाजी बीडकर, माणिक कदम, विष्णू आवरगंड, बाळू महाराज, बबन पांचाळ, चिंतामणी कुरे, ज्ञानोबा पुयड, प्रकाश लांडे, विष्णू दुधाटे, रावसाहेब आवरगंड, सुभाष आवरगंड, निर्मला लांडे, सावित्रीबाई लांडे, वसूदेव लांडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

फोटोओळी ः पालम तालुक्यातील सिरपूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गटविकास अधिकारी उदय शिसोदे. समवेत शिक्षक सुशील चव्हाण. 

फोटोओळी ः पालम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत वृक्ष देवून बिडीओ उदय शिसोदे यांचे स्वागत करताना विद्यार्थी. समवेत बीओ ए.ए. सय्यद, विस्तार अधिकारी दत्तात्रय नेलपत्रेवार यांच्यासह आदी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या