महेदवीया दायरा कब्रस्तान विहीर पुनरुज्जीवन, संरक्षक भिंत बांधकाम आणि विद्युत पुरवठ्याच्या प्रतीक्षेत

महेदवीया दायरा कब्रस्तान विहीर पुनरुज्जीवन, संरक्षक भिंत बांधकाम आणि विद्युत पुरवठ्याच्या प्रतीक्षेत
 
एस.एम.युसूफ़ यांनी केली आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे व्यथा मांडणारी फाईल सादर

बीड जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील मोमीनपुरा भागातल्या बायपास रस्त्यावर असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तान च्या विहिरीचे पुनरुज्जीवन, संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि विद्युत पुरवठ्याची गेल्या चार वर्षांपासून महेदवीया जमाअत ला प्रतीक्षाच करावी लागत असल्याने ही कामे आगामी जून महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावी. अशा व्यथा मांडणाऱ्या मागण्यांची फाईल मुक्तपत्रकार तथा जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीचे सचिव एस.एम.युसूफ़ यांनी आ. संदीप क्षीरसागर यांना दिली. यावेळी मा.आ. सय्यद सलीमजी, मा.न.से. शेख आमेर, मा.न.से. अश्फाक इनामदार, नज़रखान चाचु, कुरेशी भाई आदींची उपस्थिती होती. 
            याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील मोमीनपुरा भागात बायपास रस्त्यालगत सुमारे ४५० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक महेदवीया दायरा कब्रस्तान आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले हे कब्रस्तान गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. कब्रस्तानच्या पश्चिम व उत्तरेकडील भिंती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या नवीन बांधून घेणे आवश्यक आहे.
              तसेच मयत दफ़न करताना व ज़ियारतसाठी आलेल्या ज़ायरीनला पाण्याची सोय व्हावी म्हणून ऐतिहासिक कब्रस्तानची ऐतिहासिक विहीर चिरेबंदी बांधकामाने बांधलेली होती. जी काही वर्षांपूर्वी मोमीनपुरा बायपास रस्ता निर्माण करताना बीड नगर परिषदेकडून बुजविण्यात आली. या विहिरी शिवाय कब्रस्तानला पाण्याचे दुसरे स्त्रोत नाही म्हणून ही विहीर पुनरुज्जीवीत करून घेणे आवश्यक आहे. विहीर पुनरुज्जीवनाची कागदी कार्यवाही पूर्ण होऊन फाईल बीड नगर परिषदेत पडून आहे. मात्र पुनरुज्जीवनाचे प्रत्यक्ष कार्य गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. विहीर पुनर्जीवित झाल्यावर मयत दफन करण्यासह ज़ियारतसाठी आलेल्या ज़ायरीनकरिता पाण्याची सोय तर होईलच शिवाय पडलेल्या भिंतींच्या बांधकामासाठी सुद्धा विहिरीचे पाणी उपयोगात येईल.
        तसेच ४५० वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेले हे कब्रस्तान अजूनही अंधारात आहे. ज्यामुळे दिवस मावळल्यानंतर मयत दफ़न करताना तसेच ज़ियारतसाठी आलेल्या ज़ायरीनला अंधारामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. हे पाहता शहरात असलेल्या इतर कब्रस्तानात जसे वीजपुरवठा करण्यात येतो तशाच प्रकारे महेदवीया दायरा कब्रस्तान मध्येही वीज पुरवठा करण्यात यावा. 
           अशा आशयाच्या मागण्या जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी बीडचे सचिव तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी आ. संदीप क्षीरसागर यांना दिलेल्या फाईल मधून केल्या आहेत. यावेळी त्यांनी महेदवीया दायरा कब्रस्तानला दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी आमदारांनी भेट देऊन पाहणी केल्याचे स्मरण करून दिले. यावर आमदारांनी कब्रस्तानची विहीर रिओपनिंग व संरक्षक भिंतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे म्हटल्याचे एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या