मुधोळ मॅडम तुम्ही तरी करा बीडच्या जनतेवर उपकार, जनसामान्यांची न्यायासाठी आरोळी
जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा अंधारे मॅडम ना पडलाय विसर
पथदिव्यांचा प्रकाश व नळांना पाणी मिळणे झाले दुर्लभ
बीड जिल्हा प्रतिनिधी :- गेल्या अनेक दिवसांपासून बीड शहरातील अनेक पथदिव्यांवरील लाइट्स बंद असल्याने शहरात अंधार व काळोखाचे दिवस आले आहेत. तसेच उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना बीड नगर परिषद कडून शहरात काही ठिकाणी दहा, पंधरा, वीस दिवसाआड नळांना पाणी सोडण्यात येऊ लागले आहे. यामुळे बीड शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र याकडे बीड नगर परिषद प्रशासनासह मुख्याधिकारी अंधारे मॅडम चेही दुर्लक्ष होत असल्याने जनतेसाठी आता दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम यांनी पुढे येऊन शहरातील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यास नगर परिषदेला आदेशित करावे. तर नळांना किमान तीन ते चार दिवसाआड पाणी सोडावयास लावून बीड शहरवासीयांवर उपकार करावेत अशी मागणी होऊ लागली असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, सध्या इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना असलेल्या रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत. या काळात रोजेदारांना आपले दैनंदिन कामकाज सांभाळून रोजे ठेवावे लागतात. याचा नाही म्हटले तरी अतिरिक्त ताण रोजेदारांवर असतोच असतो. त्यात पुन्हा बीड नगर परिषद जनतेच्या मूलभूत सोयी सुविधांकडे लक्ष देत नसल्याने शहरातील अनेक भागात कित्येक खांबावरील पथदिवे बंद पडलेले आहेत. मात्र ते काढून नवीन पथदिवे लावण्यात येत नाही. म्हणून कित्येक रस्त्यांवर बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शिवाय पूर्वी जिथे आठ दिवसात एकदा नळांना पाणी सोडण्यात येत होते तिथे आता दहा, पंधरा, वीस दिवसाआड नळांना पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे रोजे ठेवून पाण्यासाठी रोजेदारांना भटकंती करावी लागत आहे. यात मुख्यतः मुली व महिला वर्गाला जास्त त्रास होतो आहे. कारण घरात पाणी भरण्याची जबाबदारी मुख्यतः त्यांच्याच खांद्यावर असते. महिला वर्गाची पाण्यासाठी चाललेली ससेहोलपट ही त्या काळात सुरू आहे ज्या काळात जिल्हाधिकारी म्हणून मुधोळ मॅडम तर बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी अंधारे मॅडम या दोन उच्चपदस्थ महिला आहेत. आपल्याला होत असलेला त्रास दूर करण्यासाठी महिला वर्गाने या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे नाही पाहावे तर कुणाकडे ? असा प्रश्नही महिला वर्गातून उपस्थित केला जात असल्याची माहिती नमूद करून मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांच्या दालनाला सातत्याने कुलूप लावलेले दिसून येत आहे. बीड नगर परिषदेत येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला त्या आता भेटतच नाही. शिवाय तक्रार व गाऱ्हाणे मांडणाऱ्याचे व्हाट्सअप नंबर ब्लॉक करीत आहेत. शिवाय कॉल केल्यास फोन उचलत नाही. अशा अनेक तक्रारीही प्राप्त होत असल्याचे म्हटले असून आता जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम यांनीच पुढे येऊन बीड शहरातील बंद असलेले पथदिवे सुरू करावयास लावून नळांना पाणी सोडण्याची अनियमितता टाळून सातत्याने तीन किंवा चार दिवसाआड पाणी नळांना सोडण्याचे नियोजन करावे अशी मागणी केली आहे. याकरिता लवकरच जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम यांना निवेदन देणार असल्याचेही नमूद केले आहे.

0 टिप्पण्या