संत ज्ञानेश्वर विद्यालय खडी येथे 23 गावातील ग्रामस्थांची बैठक संपन्न.
पालम तालुका प्रतिनिधी :- पालम ते राणीसावरगाव रस्त्यावरील (राज्य महामार्ग क्रमांक 249) 23 गावातील नागरिकांची बैठक आज संत ज्ञानेश्वर विद्यालय खडी येथे संपन्न झाली. बैठकीसाठी रस्त्यावरील गावातील अनेक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
पालम ते राणी सावरगाव हा रस्ता तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा आहे. तालुक्याच्या मुख्यालयापासून लातूर जिल्हा सीमेपर्यंत रस्त्याची व्याप्ती आहे. तालुक्यातील सुमारे 40% महसुली गावे या रस्त्यावर येतात. त्यामुळे तालुक्याला या गावातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. अनेक विद्यार्थी, नोकरदार, मजूर दार व शेतकरी तसेच अनेक नागरिक प्रशासकीय कामासाठी पालमला ये-जा करत असतात. परंतु रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील नागरिक आपण आहोत का? असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत असतात. पायाभूत सुविधा अजूनही नसल्यामुळे लोकांना अनेक गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सप्टेंबर 2022 मध्ये या भागातील नागरिकांनी पालम येथे उपोषण केले होते. त्यावेळी पालम तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी हजारो नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला होता. त्यादिवशी आमदार, खासदार आणि सरकार तर्फे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर या रस्त्याला निधी मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अधिवेशन होऊनही या रस्त्याचा कुठेही उल्लेख न झाल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
मधल्या काळात देशाचे केंद्रीय रस्ते निर्माण मंत्री श्री मा. नितीनजी गडकरी साहेब परभणीत आल्या नंतरही त्यांच्यापुढेही या रस्त्याचा विषय तालुका आणि जिल्ह्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केला नाही. जिल्ह्यातील आणि राज्यातील सगळे रस्ते होत असताना या भागातील नागरिकांवर अन्याय का असा प्रश्न या भागातील लोकांमध्ये उपस्थित होत आहे.
परिणामी या रस्त्यावरील अनेक नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी मिळून येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन लेखी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला येत्या दोन दिवसात कळविण्यात येणार आहे. आणि योग्य ती कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा संकल्प या भागातील नागरिकांनी केला आहे.
रस्त्यावरील गावांची नावे :- पेठपिंपळगाव, तेलजापुर, खोरस, उमरा, खडी, वरखेड, चोरवड, भालकुडकी, उक्कडगाव, सिरसम, तांदुळवाडी, महादेव वाडी, डोंगरगाव, पोखरणी देवी, मार्तंडवाडी, सादगीरवाडी, लांडकवाडी, मोजमाबाद, बनवस, रामापुर तांडा, गिरधरवाडी आणि फत्तु नाईक तांडा.

0 टिप्पण्या