इंडो-बांगला आंतरराष्ट्रीय मैत्री पुरस्कार - 2021 शशांक कुलकर्णी यांना जाहीर

इंडो-बांगला आंतरराष्ट्रीय मैत्री पुरस्कार - 2021 शशांक कुलकर्णी यांना जाहीर


वृत्तांकन शशांक कुलकर्णी :- सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा संशोधक शशांक कुलकर्णी यांना कृषी आणि शेतकरी धोरणांच्या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल प्रतिष्ठित इंडो-बांगला आंतरराष्ट्रीय मैत्री पुरस्कार - 2021 जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड या जगप्रसिद्ध संस्थेतर्फे हा महत्त्वाचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.


ही संस्था जागतिक स्तरावर शिक्षण आणि संशोधन अधिक सहज उपलब्ध आणि अधिक एकत्रित करण्यासाठी कार्य करते. याचे मुख्यालय शिकागो, यूएसए आणि इंदोर, भारत येथे आहे. पुरस्काराच्या आयोजन समितीमध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांतील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ.राजीव पाल यांनी पत्राद्वारे दिली.


ते म्हणाले की, शशांक कुलकर्णी यांचे संशोधन योगदान भारताबरोबरच बांगलादेशसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. भारत आणि बांगलादेशच्या मैत्रीमध्ये योगदान देणाऱ्या तरुण संशोधकाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.


शशांक कुलकर्णी यांनी त्यांच्या संशोधनावर  आधारित ‘स्वामिनाथन कमिशनः ए फाऊंडेशन ऑफ फार्मर पॉलिसीज इन इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या कृषी आणि शेतकरी धोरणात विशेष योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुस्तकास भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो. एम. एस. स्वामिनाथन यांची प्रस्तावना मिळालेली आहे. हे पुस्तक नवी दिल्ली येथील एकेडमिक फाउंडेशन या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.  त्यांनी आयुष्याची काही महत्वपूर्ण वर्षे राष्ट्रीय किसान आयोगाच्या अर्थात स्वामिनाथन आयोगाच्या या पाच अत्यंत महत्वपूर्ण अहवालाचे सखोल विश्लेषण आणि आढावा घेण्यात व्यतीत केली आहेत.  स्वामिनाथन आयोग हा आपल्या देशातील एकमात्र व पहिला असा आयोग आहे जो खास शेतकऱ्यांसाठी बनवला होता. या महत्त्वपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून स्वामीनाथन आयोगाच्या सर्व महत्त्वपूर्ण शिफारसी व निरीक्षणे आता धोरणकर्ते, कृषी अधिकारी, शेतकरी नेते, शेतकरी संशोधक, विद्यार्थी आणि भारतातील व  जगातील सर्व नागरिकांसाठी सहज उपलब्ध झाल्या आहेत.  शशांक कुलकर्णी हे कृषी अभियंता आहेत. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात पदवी संपादित केली आहे. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील असून  सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे सिनियर रिसर्च फेलो म्हणून जम्मू काश्मीर मधील जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन या विभागात गेली चार वर्षे भारताच्या शेती व शेतकरी धोरणांवर संशोधन करीत आहेत. यामध्ये राष्ट्रीय शेतकरी धोरण, स्वामिनाथन आयोग, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यावरील शाश्वत धोरणात्मक उपाय यांसारख्या भारतीय शेती व शेतकरी यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे.  त्यांनी आतापर्यंत विविध विषयांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत एकूण दहा पुस्तके लिहिली आहेत. तसेच विविध मानांकित जागतिक नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत त्याच बरोबर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. या पुरस्कारासाठी शशांक कुलकर्णी यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या