खुलताबाद नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक
मुनीर शाह, बाजार सावंगी :- खुलताबाद येथील नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सय्यद आमेर पटेल नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यानंतर आता नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपद तसेच स्वीकृत सदस्य पदासाठी शुक्रवार (दि. १६) रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक होणार आहे.
नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी सय्यद आमेर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या गटनेतेपदी गजानन फुलारे यांची निवड झाली असून, भाजपकडील गटनेतेपदाबाबतही हालचाली सुरू आहेत.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) किंवा भाजप यापैकी कोणाच्या बाजूने जाते, की महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी एकत्र येतात, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. याचवेळी काँग्रेसच्या गटनेतेपदी सलिमोद्दीन इफ्तेखारोद्दीन यांची निवड करण्यात आली आहे.
नगरपरिषदेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ९ नगरसेवक
भाजप – ७ नगरसेवक
काँग्रेस – ४ नगरसेवक
स्वीकृत सदस्यपदी कोणाची निवड होते आणि उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण खुलताबाद तालुक्याचे लक्ष लागले आहे.



0 टिप्पण्या