राज्य शासनाकडून वर्षातून दोनदा ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी होणार ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा - एस.एम.युसूफ़

राज्य शासनाकडून वर्षातून दोनदा ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी होणार ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा - एस.एम.युसूफ़ 

बीड जिल्हा प्रतिनिधी :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षातून दोनदा मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
            याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७ मे २०२३ रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्याबाबत (६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य चाचणी/तपासणी शासनामार्फत करण्याबाबत व इतर विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये, राज्य महानगर कामगार विमा तसेच पालिका/नगर पालिकेच्या अखत्यारितील सर्व रुग्णालये यांच्या मार्फत ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य चाचणी/तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड देण्यात येवून त्यांना सुपर स्पेशॅलिटी दवाखान्यात सुध्दा सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश नुकतेच १९ जून २०२३ रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकातून देण्यात आले आहेत.
                शासनाने काढलेल्या परिपत्रकात  नमूद करण्यात आले आहे की, ज्येष्ठांना दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनामधून मोफत उपचार मिळावेत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये अटी व शर्ती मध्ये सर्व ज्येष्ठांचा समावेश करावा. ज्येष्ठ नागरिकांची राज्यातील १.५० कोटी संख्या विचारात घेता सर्व रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व व संबंधित चाचणी/तपासण्याकरीता आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात यावे. ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य चाचणी तपासणी शासनामार्फत करण्यात यावी.  जेणेकरून ज्येष्ठांच्या आरोग्य समस्या सोडविण्यास मदत होईल असे नमूद केले असून याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या