लोकं वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागले!आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरू - एस.एम.युसूफ़

 लोकं वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागले!आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरू - एस.एम.युसूफ़



बीड प्रतिनिधी :- आता लोकंच वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले असून अशीच अवस्था राहिली तर आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरू असे उद्विग्न मत ही व्यक्त केले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड शहरात असलेल्या न्यू सुंदर मेडिकल ते थोरातवाडी आणि जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याकरिता चला थोडंसं वाचूया या व्हाट्सअप ग्रुप ने जून चा पूर्ण महिना ग्रुपमध्ये जनजागृती करून वृक्षारोपणासाठी ६ हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्यातून जुलै महिन्यात १३ कडंबाची तर ३ गुलमोहराची ८ ते १२ फूट उंचीची एकूण १५ झाडे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा लावली. ही १५ ही झाडे लावल्यानंतर आतापर्यंत चांगली वाढत आहे. असे असताना काही नतदृष्टांची नजर या झाडांना लागली. १५ पैकी २ गुलमोहराची तर ३ कडंबाची झाडे अज्ञातांनी तोडली आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कडंब आणि गुलमोहर ही दोन्ही झाडे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या यापैकी कोणतेही जनावर खाणे तर दूर या झाडांजवळ जात सुद्धा नाही. यामुळेच येथे कडंब आणि गुलमोहरांची झाडे लावली होती. परंतु ज्या झाडांना जनावर इजा पोहोचवीत नाही, त्याचा पाला किंवा साल खात नाही, अशा कडंब आणि गुलमोहराच्या झाडांपैकी ३ कडंबांची तर २ गुलमोहराची झाडे काही नतदृष्टांनी तोडून टाकली आहे. आता उर्वरित १० झाडांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित जाळ्या लावण्याएवढे आर्थिक पाठबळ चला थोडंसं वाचूया या व्हाट्सअप ग्रुप कडे नाही. आणि जनावरांऐवजी लोकंच अशा प्रकारे वृक्षारोपण केलेली झाडे तोडू लागले, वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागले तर आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरू असे उद्विग्न मत या दोन्ही रस्त्यांवर झाडे लावण्यासाठी चला थोडंसं वाचू या या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पुढाकार घेतलेले ग्रुप ॲडमिन तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या