उमेदवारांना दिली जात असलेली पाठिंबा पत्रे किती खरी, किती खोटी!प्रत्येक समाजाने जागरूक राहण्याची गरज - एस.एम.युसूफ़
बीड प्रतिनिधी :- सध्या विधानसभा निवडणूक चरम सीमेवर आलेली आहे. मतदानाला फक्त एक आठवडा शिल्लक राहिल्याने उमेदवारांना पाठिंबा दिल्याची प्रसिद्धी पत्रके प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित करण्याची चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. अशी पाठिंबा पत्रे किती खरी आणि खोटी किती असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, निवडणुकीत उभ्या असलेल्या पक्षीय किंवा अपक्षीय उमेदवारांना अमुक समाजाचा, तमुक समाजाचा पाठिंबा दिल्याची पाठिंबा पत्रे अनेकांकडून काढण्यात येत आहे. (की काढायला लावली जात आहे? हा संशोधनाचा विषय आहे). अशा पाठिंबा पत्रांमध्ये समाजाचा उल्लेख करून ती नेत्यांना किंवा संबंधित उमेदवाराला देण्यात येते. अशी पाठिंबा पत्रे उमेदवाराला दिल्याचे संबंधित पाठिंबा दाते अशा पाठिंबा पत्रांची प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी करतात. तेव्हा समाजाला कळते की, आपल्या समाजाचा पाठिंबा अमुक उमेदवाराला दिलेला आहे. अशा पाठिंबा पत्र देणाऱ्या व्यतिरिक्त संबंधित उमेदवाराला संपूर्ण समाजाचा पाठिंबा असेलच असे नाही. समाजाचा चेहरा म्हणून नेत्यांशी किंवा उमेदवारांशी व्यवहार करणारे काही दिवटे जवळपास प्रत्येक समाजात वावरत असतात. त्यांनी नेत्याशी किंवा उमेदवाराशी केलेला व्यवहार फक्त त्यांनाच माहीत असतो. यात ते अनेक मार्गाने वैयक्तिकरित्या स्वतःचे चांगभले करून घेतात तर कुणी आर्थिक लाभ करून घेतात. या सर्वांचा समाजातील इतरांना मागमूस लागत नाही. पाठिंबा देताना ना समाजाची बैठक घेतली जाते, ना समाजाचे मत घेतले जाते. फक्त ठराविक दिवट्यांची (समाजाची नव्हे) चांडाळ चौकडी एकत्र येऊन अशा प्रकारची पाठिंबा पत्रे नेत्यांना किंवा उमेदवारांना देत असल्याचे चर्चिले जात आहे. जे कार्यकर्ते नेत्यांच्या किंवा उमेदवारांच्या मागेपुढे शेपूट हलवून फिरतात अशांना हे नेते आणि उमेदवार तुमच्या समाजाच्या नावाने पाठिंबा पत्रे काढा म्हणून सांगत असल्याचेही बोलले जात आहे. अशा अवस्थेत आता आपापल्या समाजातील दिवट्यांवर समाजातीलच जागरूक नागरिकांनी लक्ष ठेवावे. जेणेकरून चुकीच्या उमेदवाराला समाजाच्या नावाने पाठिंबा पत्रे दिल्याची प्रसिद्धी माध्यमातून होऊ नये आणि समाजात चुकीचे संदेश जाऊ नये. यासाठी प्रत्येक समाजातील मतदारांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले.
0 टिप्पण्या