महिलांनी भूलथापांना बळी पडून रेशनकार्ड ब्लॉक करून घेऊ नये - एस.एम.युसूफ़ ५० रुपयांचा फॉर्म भरून दरमहा ५ हजार रुपये मिळण्याची अफवा

 महिलांनी भूलथापांना बळी पडून रेशनकार्ड ब्लॉक करून घेऊ नये - एस.एम.युसूफ़,५० रुपयांचा फॉर्म भरून दरमहा ५ हजार रुपये मिळण्याची अफवा



बीड प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून शहरात एक अफवा जोरात फिरू लागली आहे, ती म्हणजे पन्नास रुपयांचा फॉर्म भरून दिल्यास रेशन कार्डधारकांना शासनाकडून दरमहा पाच हजार रुपये मिळणार. असं काहीही शासनाकडून किंवा प्रशासनाकडून अधिकृतरित्या अजूनपर्यंत तरी कळविण्यात आलेले नाही. शिवाय आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. यामुळे या काळात आता कोणतीही नवीन योजना शासन-प्रशासनाकडून अंमलबजावणीसाठी येण्याची दुरान्वयेही शक्यता नाही. यामुळे रेशन कार्डधारकांनी अशा अफवांना बळी पडू नये आणि आपले रेशन कार्ड ब्लॉक करून घेऊ नये. असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राज्य शासनाने जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून सातत्याने काही ना काही योजनांच्या नवनवीन अफवा उडू लागल्या आहेत. यात रेशन कार्डधारक महिलांना दरमहा पाच हजार रुपये मिळणार. दरमहा दीड हजार रुपये आले की नाही हे पाहण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या महिलांना शासनाकडून अँड्रॉइड मोबाईल मिळणार. उज्वला गॅस योजनेची जोडणी असलेल्या महिलांना तीन मोफत सिलेंडर सह अजून एक जास्तीचा गॅस सिलेंडर मोफत मिळणार वगैरे अफवांचा बाजार गरम झालेला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने उडविलेल्या अफवांच्या कोणत्याही योजना अमलात तर येणार नाहीतच शिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणारे दरमहा पंधराशे रुपये सुद्धा आता विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थानापन्न झाल्यावर नवीन सरकारने ही योजना पुढे चालू ठेवण्याची घोषणा केल्याशिवाय ते सुद्धा महिला वर्गाला मिळतील की नाही याची शाश्वती नाही. तेव्हा महिला वर्गाने कोणत्याही अफवांना, आमिषांना बळी न पडता कुणालाही कुठलाही फॉर्म भरून न देता, तहसील कार्यालय बाह्य कुठलेही ऑनलाइन काम करू नये. काही बनवेगिरी करणारे लोक कोणतेतरी फॉर्म पन्नास रुपये घेत ते भरून त्याचा काहीतरी ऑनलाईन कुटाणा करत असल्याचे चर्चिले जात आहे. ज्या महिला या फॉर्म भरून ऑनलाईन कुटाणा करीत आहे. त्यांचे रेशन कार्ड ब्लॉक होत असल्याचेही बोलले जात आहे. ब्लॉक झालेल्या या महिलांचे रेशन कार्ड पूर्ववत कोण सुरू करून देणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकरणात पुरवठा विभागासह तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या सर्वांनी दक्ष राहून कारवाई करण्याची गरज आहे. या मागील अष्टमकुष्टम काय आहे? कोण अशा प्रकारे महिलांना मुर्खात काढून ५० रुपयांसाठी त्यांचे रेशन कार्ड ब्लॉक करत आहे? याचा सोक्षमोक्ष किंवा छडा लावण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक गोरगरीब महिलांचे रेशनकार्ड ब्लॉक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन रेशनकार्ड विषयी उडविण्यात आलेल्या अफवांना बळी पडू नका. असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या