एसटी आरक्षणाबाबत पालम येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
पालम प्रतिनिधीं :- तालुक्यातील सकल धनगर समाजाने पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्ग आडवून एसटीच्या आरक्षण अंमलबजावणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रास्तारोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा पहावयास मिळाल्या असून आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता.
अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी आहे. त्यासाठी पंढरपूरसह अन्य ठिकाणी बेमूदत उपोषण सुरू आहे. त्याच्या समर्थनार्थ सोमवारी पालम तालुक्यातील सकल धनगर समाजाची बैठक घोरपडे गल्लीतील समाजमंदिरात झाली. तदनंतर रास्तारोकोच्या ठिकाणापर्यंत समाजबांधवांनी सवाद्य मोर्चा काढला. तो ममता शाळेमार्गे पालम ते लोहा रोडवरील पेठपिंपळगाव चौकात गेला. तिथे मान्यवरांनी भाषणे केली. तोपर्यंत पालम ते राणीसावरगाव, पालम ते परभणी रोड आणि पालम ते गंगाखेड, पालम ते लोहा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. ब-याच वेळानंतर पोलिसांच्या विनंतीने सदर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
0 टिप्पण्या