राजकारणी काढू लागले विविध प्रश्न मार्गी लागल्याची पत्रके
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर दिसेलच किती प्रश्नांवर काम झाले - एस.एम.युसूफ़
बीड प्रतिनिधी :- सध्या राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे डोहाळे अनेक हौसे, नवसे, गौश्यांना लागले आहे. यामुळे चोहीकडून सर्वच पक्षाचे तथाकथित नेते, कार्यकर्ते दरदिवशी अमुक प्रश्न मार्गी, तमुक प्रश्न मार्गी अशा प्रकारची पत्रके काढून प्रसिद्धी माध्यमातून टाकत आहेत. जी पत्रके काढली जात आहेत त्यातून प्रत्यक्षात खरेच किती प्रश्न मार्गी लावले? किती प्रश्नांवर काम झाले? हे विधानसभा निवडणूक निकालानंतर दिसून येईलच, तोपर्यंत राजकारण्यांकडून टाकण्यात येणारी प्रश्न मार्गी लावल्याची पत्रके पाहण्याशिवाय गत्यंतर नाही असे रोखठोक मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे की, आता जे नेते कार्यकर्ते पत्रके काढून प्रश्न मार्गी लावल्याचे म्हणत आहेत, मुळात त्यांच्याच नाकर्तेपणामुळे ते प्रश्न निर्माण झालेले असतात. त्यांच्यामुळेच त्या-त्या प्रश्नांवर कामे होत नाहीत आणि तेच प्रश्न पुन्हा ते जनतेसमोर मार्गी लागले म्हणून मांडत असल्याने यात त्यांचाच निलाजरेपणा दिसून येतो. जे गेल्या पाच वर्षात केले नाही ते निवडणुकीच्या तोंडावर मार्गी लावल्याची पत्रके काढणे म्हणजे पडलो तरी नाक वर ही वृत्ती यात दिसून येते आणि अशी पांचट पत्रकं छापल्याने ज्या वृत्तपत्रात ती प्रकाशित केली जातात ती वृत्तपत्रे हातात घेतल्यानंतर अशा पत्रकरुपी बातम्यांकडे वाचक साधी नजर टाकायलाही तयार नाहीत. यामुळे अशा प्रकारची पत्रके छापणाऱ्या वृत्तपत्रांच्या विक्रीवर सुद्धा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आता जनता शहाणी झाली आहे. यांच्या अशा प्रश्न मार्गी लागल्याच्या भूलथापारुपी पत्रकांवर ती विश्वास करत नाहीये. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा स्थितीत जनता आलेली आहे परंतु स्वतःला फार मोठे कर्ते करविते म्हणून जनतेसमोर सादर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांचा प्रश्न मार्गी लागल्याची पत्रके काढण्याचा केविलवाना प्रयत्न काही थांबायला तयार नाही. अशी पांचट पत्रके छापून आपल्या वृत्तपत्राचा टीआरपी वाचकांच्या हृदयातून व नजरेतून किती खाली येऊ द्यायचा? अशी पत्रके न छापता सत्य तेच प्रकाशित करण्याचा विडा वृत्तपत्रांनी उचलणे गरजेचे आहे. नाहीतर अशा पत्रकांच्या भंपक आणि पांचट प्रसिद्धीमुळे आपली वर्तमानपत्रे वाचकांच्या नजरेतून उतरतील. याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे रोखठोक मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी मांडले आहे.
0 टिप्पण्या