बीड शहराला अळ्यांयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांनी फिल्टर प्लांट कडे लक्ष द्यावे :- एस.एम.युसूफ़

 बीड शहराला अळ्यांयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांनी फिल्टर प्लांट कडे लक्ष द्यावे :- एस.एम.युसूफ़



बीड प्रतिनिधी :- नगर परिषदेकडून बीड शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या फिल्टर प्लांट कडे बहुतेक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने शहराला अळ्या युक्त गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. यामुळे बीड शहरवासियांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कारण प्रत्येक जण जारचे विकत पाणी घेऊ शकत नाही. तरी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जातीने लक्ष घालुन बीड शहराला होत असलेला घाण पाण्याचा पुरवठा थांबवून अळ्या व गाळमुक्त पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहराच्या अनेक भागात नळांना पाणी आल्यानंतर ते दूषित असल्याचे दिसू लागले आहे. नळांच्या पाण्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून गाळ येतच होता. आता काही दिवसांपासून तर चक्क वळवळणाऱ्या अळ्या सुद्धा पाण्यात येऊ लागल्या आहेत. असे अळ्या युक्त गढूळ पाणी पिऊन किंवा त्याने जेवण बनवून बीडवासियांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागेल. अगोदरच पावसाळा ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य समस्या उद्भवतात यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवाला इतर कोणत्याही कारणापेक्षा जास्त आरोग्य समस्या उद्भवतात ते दूषित पाण्यामुळे. इथे तर बीड शहरात बीड नगर परिषद करीत असलेला पाण्याचा पुरवठा चक्क अळ्या व गाळ मिश्रित असल्याने किती मोठ्या प्रमाणात बीड शहरवासियांना आरोग्य समस्या उद्भवतील याचा विचार सहज येईल. हे पाहता बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जातीने बीड शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या फिल्टर प्लांट ची पाहणी करावी तसेच आणि अळ्या युक्त गढूळ पाणी कोणत्या कारणामुळे येत आहे, याची सखोल चौकशी करावी. कामात कुचराई करणारे पाणीपुरवठा अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळल्यास अशांवर कडक कारवाई करावी. बीड शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना पाठीमागे घालता कामा नये. असेही मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या