उर्दू माध्यमातील सेवानिवृत्त शिक्षकांनी अरबी मदरशांमध्ये शैक्षणिक सेवा विनामूल्य द्यावी - सय्यद शहिंशाह
बीड प्रतिनिधी :- उर्दू माध्यमातील सेवानिवृत्त शिक्षकांनी अरबी मदरशांमध्ये शैक्षणिक सेवा विनामूल्य द्यावी असे आवाहन शहरातील सुप्रसिद्ध शाह आर्ट्सचे संचालक सय्यद शहिंशाह यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आता शिक्षकांना पूर्वीसारखे तुटपुंजे वेतन नाही, चांगले वेतन आहे. यामुळे जेव्हा शिक्षक सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना निवृत्ती वेतन ही चांगल्यापैकी मिळते. शिवाय वयाची ५८ वर्षे संपल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यावर घरी बसून राहण्याऐवजी अरबी मदरशांमध्ये विविध विषयांवर मदरशातील विद्यार्थ्यांना त्यांनी विनामूल्य शिक्षण दिले तर अरबी मदरशातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले दर्जेदार शिक्षण मिळू शकते. शिवाय निवृत्तीनंतर कार्यमग्न राहिल्याने आरोग्याच्या समस्याही उद्भवत नाहीत. लक्षात घ्यायला हवे की, मदरशांमध्ये जे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात त्यातील बहुतांश किंबहुना ९९% विद्यार्थी हे अत्यंत गोरगरीब कुटुंबातील असतात. त्यांचे कुटुंबीय आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करू शकत नाहीत. कुटुंबीयांकडे पैसाच नसतो तर खर्च करणार कुठून? मदरसा चालविणाऱ्या कमिट्या सुद्धा आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. आज समाजात वावरताना अरबी मदरशांमध्ये शैक्षणिक शिक्षण दिल्या जात असल्याचे जरी म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की, शैक्षणिक शिक्षण देण्याकरिता मदरशांमध्ये पारंगत शिक्षकच नाहीत. कारण पारंगत शिक्षकांना मानधन किंवा वेतन देण्याकरिता आवश्यक असलेली राशी मदरसा चालविणाऱ्या कमिट्यांकडे नसते. अशा अवस्थेमध्ये मदरशातून अरबी सोबतच शैक्षणिक शिक्षण दिले जात असल्या चे जे सांगितले जात आहे तो एक शुद्ध भास आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. ही वस्तुस्थिती जवळून पाहण्याकरिता बीड शहरासोबतच जिल्हाभरातील उर्दू माध्यमातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी अरबी मदरशांची पाहणी करावी आणि स्वतःहून पुढाकार घेत जिल्हाभरात जेवढे अरबी मदरसे सुरू आहेत त्यात आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्याकरिता विनामूल्य शैक्षणिक शिक्षण द्यावे असे आवाहन सय्यद शहिंशाह यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
0 टिप्पण्या