मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधा - आ.डॉ.गुट्टे

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधा - आ.डॉ.गुट्टे

पालम येथे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 



पालम प्रतिनिधी :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जनजागृती करणे आवश्यक आहे. या योजनेच्या पात्रते संदर्भातील अनेक अटी शिथील झाल्या आहेत. याची सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना माहिती द्यावी. राखी पौर्णिमेपर्यंत तालुक्यातील किमान ५० टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी या योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधावेत, असे आवाहन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले. 


योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील तहसील कार्यालय येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रशिक्षणात तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. 


पुढे बोलताना आमदार डॉ.गुट्टे म्हणाले, प्रशासकीय यंत्रणेने तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करावी. योजनेची परिपूर्ण माहिती प्रत्येक कुटुं‌बाला द्यावी. आधार कार्ड व बँक खाते क्रमांकाची अचूक नोंद घ्यावी. जेणेकरून महिलांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्रुटी आढळल्यास कागदपत्रांची पूर्तता करून घेवून त्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी. एकही अर्ज नामंजूर होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. 


महायुती सरकारने अतिशय महत्त्वकांशी अशी योजना सुरू करून महिला सक्षमीकरणास हातभार लावला आहे. त्यामुळे आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत जावून माताभगिनींची चौकशी करा. तसेच या योजनेपासून एकही महिला वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने अगदी गाव पातळीवर नियोजन करून फॉर्म भरून घ्यावेत, अशाही सूचना आमदार डॉ.गुट्टे यांनी उपस्थितांना केल्या. 


या प्रशिक्षण कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, रासप प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी उदय शिसोदे, एकात्मिक बाल विकास योजनेच्या योगिता माटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, माजी सभापती गणेशराव घोरपडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भगवान सिरस्कर, अजीम खान पठाण, नगरसेवक उबेद खान पठाण, बाबासाहेब ऍंगडे, राहुल शिंदे, विनोद किरडे, राजेभाऊ किरडे, यांच्यासह तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या