प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेत मोठा भ्रष्टाचार; गोरगरीबांचे गॅस कनेक्शन दुसऱ्यांनाच दिले चौकशी करून दोषी गॅस एजन्सी वितरकांचे परवाने रद्द करा

 प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेत मोठा भ्रष्टाचार; गोरगरीबांचे  गॅस कनेक्शन दुसऱ्यांनाच दिले चौकशी करून दोषी गॅस एजन्सी वितरकांचे परवाने रद्द कथा



बीड प्रतिनिधी :- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे तसेच गोरगरिबांचे गॅस कनेक्शन दुसऱ्यांना दिल्याचे निदर्शनास येत आहे. याविषयी सखोल चौकशी करून दोषी गॅस एजन्सी वितरकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, मोहज़ीब इनामदार, शेख रईसोद्दीन आणि इरफ़ान बागवान यांनी दिला आहे.



याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काथही वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडून गोरगरीब कुटुंबीयांकरीता प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना राबविण्यात आली होती. शासनाच्या धोरणानुसार या योजनेतून वितरण करण्यात आलेल्या गॅस कनेक्शन ची आता केवायसी करण्याचे आदेश आले आहेत. म्हणून या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला गॅस कनेक्शन ज्यांच्या नावावर दिलेले आहेत, त्यांना केवायसी करून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज येऊ लागले आहेत आणि इथेच नेमका घोटाळा झाला. गॅस एजन्सी वितरकांनी सर्वसामान्य गोरगरीब निरक्षरांचे गॅस कनेक्शन स्वतःच्या तसेच पुढार्‍यांच्या सोबत मिळून संगनमताने जवळच्या लोकांना दिले. गोरगरिबांच्या नावाने मिळालेले गॅस कनेक्शन घेतल्यापासून आतापर्यंत हा धंदा बिनबोभाट चालू होता. परंतु आता केवायसी करावी लागत असल्याने ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन देण्यात आले आहे, त्यांच्या मोबाईलवर जेव्हा यासाठी मेसेज पडू लागले तेव्हा एकच खळबळ उडू लागली आहे. अनेकांना तर ४४० व्होल्ट चा झटका लागावा त्याप्रमाणे करंट लागत आहे. कारण प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्यांनी गॅस कनेक्शन घेतलेच नाही अशा सर्वसामान्य गोरगरीब व अशिक्षितांना केवायसी करून घेण्याचे मेसेज येत असल्याने अनेक जण गॅस एजन्सी मध्ये जाऊन जेव्हा विचारपूस करू लागले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. जेव्हा प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण केले जात होते तेव्हा खऱ्याखुऱ्या गरजवंत गोरगरिबांपेक्षा गॅस एजन्सी वितरकांनी अशा लोकांऐवजी भलत्यांनाच गॅस कनेक्शन दिलेले आहे. त्यात अनेक राजकीय कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांचाही समावेश आहे. गॅस वितरकांसह कार्यकर्ते आणि पुढार्‍यांनी मिळून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या धोरणानुसार संगनमताने गट्टी जमवून धनदांडग्यांना गॅस कनेक्शन दिले आहे. ज्यांनी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत चोरट्या मार्गाने गॅस कनेक्शन मिळविले असे लोक या कनेक्शनच्या माध्यमातून मिळालेले गॅस सिलेंडर घरांसोबतच चार चाकी गाड्या, तीन चाकी ऑटो रिक्षात सर्रासपणे गॅस वापरू लागले आहेत. हा सर्व उद्योग आतापर्यंत बिनबोभाट सुरू होता परंतु आता केवायसी करावी लागत असल्याने याचे बिंग फुटू लागले आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत असून खरेखुरे गरजवंत सर्वसामान्य गोरगरीब अशिक्षित या योजनेतून मिळणाऱ्या गॅस कनेक्शन पासून वंचित राहिले आहेत. अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या नावे वितरित करण्यात आलेले गॅस कनेक्शन त्यांना मिळवून देण्यासाठी, गॅस एजन्सी वितरकांकडून व पुढार्‍यांकडून या योजनेत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी. योजनेत भ्रष्टाचार केलेल्या गॅस एजन्सी वितरकांचे परवाने रद्द करण्यात यावेत. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून एस.एम.युसूफ़, डॉ. संजय तांदळे, मोहज़ीब इनामदार, शेख रईसोद्दीन आणि इरफ़ान बागवान यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या