शहिद भगतसिंग भारतीय क्रांतीचा युवा प्रणेता.

शहिद भगतसिंग भारतीय क्रांतीचा युवा प्रणेता.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ढोबळमानाने पाच प्रवाह होते.

1)मध्यमवर्गी राष्ट्रवादी 2)सशस्त्र उठाव /बंड करणारे 3)सामाजिक सुधारणा /परिवर्तनाच्या अंगाने भिडणारे
4)साम्यवादी 5)पुनरुज्जीवनवादी राष्ट्रवादी
 

(धर्माधिष्ठित राष्ट्रवादी) त्या सार्‍या प्रवाहा मधिल बहुसंख्य अनूयायी व जनविभागांना भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेरित तर केलेच पण या प्रवाहामधिल विविध वर्गजातींच्या जनविभागांना एकत्र आणण्याची क्षमताही भगतसिंगांच्या विचारात व राजकारण होती याची झलक आपणास पहावयास मिळते. 


धर्म आणि समाज, नास्तिकता व धर्मनिरपेक्षता आणि त्यांच्या अस्पृश्यता वर्णाक्षम व्यवस्थेशी असलेला संबंध या संदर्भात सामाजिक - राजकीय मुद्यांची गुंतागुंत पकडण्याचा त्यांचा प्रयत्न पाहिल्यास भारतीय वास्तवात बाबतचे त्यांचे समग्र भान अधिक स्पष्टपणे जाणवते जे त्या काळातील साम्यवादी चळवळीमध्येही फारसे नव्हते. तो स्वतः नास्तिक झाल्यावरही त्याची समज 'धर्मवादी (जमातवादी) विरुद्ध धर्मनिरपेक्षता वादी' या यांत्रिक वा सरधोपट द्वैताच्या पलिकडे जाणारी होती आणि ती उदारमतवादी - विवेकवादी (रॅशनॅलिस्ट) अथवा यांत्रिक जडवादाचीही नव्हती तर मार्क्सवादी होती असेच दिसते. 

भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांचे विचार आणि त्यांच्या राजकीय व्यवहार यात काही अंतर्विरोध होते हे खरे ते नजरेआड न करता आणि ते गंभीरपणे विचारात घेऊनही असे म्हणता येते की भारतीय क्रांतीचा समग्र कार्यक्रम विकसित करण्याच्या दृष्टीने भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विचारात आणि कार्यात ज्या शक्यता होत्या त्या नंतरच्या काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या आणि क्रांतीकारी प्रवाहाच्या हातून सूटन गेल्या वा जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या. 

भगतसिंग यांच्या राजकीय वाटचालीचा एकंदरीत काळ हा फार फार तर ७ ते १० वर्षाचा आहे. या काळात त्यांच्या वैचारिक विकास हा चार टप्प्यांतून  गेला आसल्याचे ते सांगतात. १)गांधीवादी राष्ट्रवाद २)स्वप्नाळू क्रांतीकारी ३)काही काळ अराज्यवादी - साम्यवादी ४)मार्क्सवादी शास्त्रीय समाजवादी. या चारही टप्प्याच्या बुडाशी असलेले बदल सुसंगती, सातत्य लक्षात घेतले तर ते चित्र साचेबंद समाजापेक्षा फार वेगळे आहे. एक क्रांतिकारक कार्यकर्ता आणि एक तरुण अभ्यासक म्हणून भगतसिंग हा मानव मुक्तीच्या कल्पना प्रणाली आणि क्रांतीकारी दृष्टिकोनाच्या शोधात होते हा प्रवास त्यांच्या शालेय जिवनापासून सूरु झाला असे म्हणता येईल. 
तुरुंगातून बाहेर पाठवलेल्या "युवा राजकीय कार्यकर्त्यांनां पत्र" या आपल्या महत्वपूर्ण दस्तऐवजात भगतसिंग लिहतात "क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी समाजव्यवस्था संपुर्णपणे उलथून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे या ध्येयाच्या पुर्तीसाठी ताबडतोबीने सत्ता हस्तगत करणे " आणि समाजवादाचा अर्थ पुठेच स्पष्ट करतात  "आमचे ध्येय आहे एका नव्या पायावर, मार्क्स वादाच्या पायावर समाजाची पुनर्रचना..! " सर्वव्यापी दारिद्र्याचे निर्मुलन करण्याच्या तीवृ जाणीवेतून भगतसिंग या विचारप्रवाहात पोहचले होते. भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी केवळ राजकीय नव्हे तर लोकांचे आर्थिक स्वातंत्र्यही आवश्यक आहे. आणि म्हणून नौजवान भारत सभेचे कार्य साम्यवादी धर्तीवर आखलेले होते जिचे खरे उद्दिष्ट कामगार आणि शेतकऱ्यांना संघटीत करणे होते. 

भगतसिंग ईश्वर आणि धर्म या संकल्पनांची चिकित्सा सुध्दा अत्यंत तर्कशुद्ध मांडणीच्या आधारे करतात. ती केवळ यांत्रिक तार्किक युक्तिवादाच्या मर्यादेत अडकून पडणारी चिकित्सा नाही. तर ऐतिहासिक सामाजिक राजकीय आर्थिक आणि मानसिक सांस्कृतिक संदर्भासह वा पैलूंसह या संकल्पणाकडे पाहाण्याचा त्यांचा प्रयत्न  त्यातून जानवतो. या संकल्पणाचे आणि त्यांच्याशी निगडित संस्थात्मक रचणाचे शोषणाशी व विषमतेशी असलेले नाते पुढे ठेवतात. तसेच सरंजामी - भांडवली व्यवस्थेमध्ये धर्म हा सत्ताधारी वर्गाच्या हातातले हत्यार कसा बनतो यावर भर देतो. मात्र त्याच्या दुसर्‍या पैलूकडेही दुर्लक्ष करत नाहीत. निसर्ग ऐतिहासिक प्रक्रिया आणि समाज यांच्या विषयीच्या समजेचा अभाव असल्यामुळे आणि स्वतः चे जीवन समाज व भवितव्य यावर नियंत्रण मिळवण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे मानसांना आणि मानवी समाजाला धर्म आणि ईश्वराची गरज कशी भासते व या संकल्पाचा उदय कसा होतो याकडेही लक्ष वेधतो. संकटात आणि दैन्य दुःखात जगण्याऱ्या माणसासाठी धर्म व ईश्वर हे एक उपयुक्त "मिथ" कसे बनते याचीही चर्चा करतो. वेदाकडे परत चला आशा  विचारसरणी ची मांडणी त्या काळात साधू वास्वानी सारखी पुनरुज्जीवनवादी मंडळी मांडत होती त्यावर 'नये नेतावोंके अलग अलग विचार' या लेखात घणाघाती टीका करतना याच लेखात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरु या स्वतंत्रलढ्यातील नव्या नेत्याची तुलना करतात दोघांचा मोठेपणा व योगदान मान्य करतात पण प्राचीन भारताच्या दैदीप्यमान इतिहासात बुडणाऱ्या भावनिक आणि गुढवादी करण करणार्‍या नेताजींचे तत्कालीन विचार हे राष्ट्रवादाच्या मर्यादा ओलांडून शकत नाहीत सुभाषबाबु फक्त राजकीय बदलावर भर देतात असे भगतसिंग दाखवून देतात. लेखात पुढे जाऊन भगतसिंग सल्ला देतात की नेहरुच्या विचाराचे अनूकरण करावे कारण त्यांची विचारसरणी ही आधुनिक समाजवादी मुल्यावर आधारलेली आहे. ती प्रचलित समाजव्यवस्थेत क्रांतीकारी परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य करते आणि तत्कालीन आंतरराष्ट्रीय संदर्भाचे भान त्यामध्ये दिसते. राष्ट्रीय पातळीवर धर्माची राजकारणा पासून फारकत करण्याची भुमीका घेणार्‍या नेत्यांचे ते स्वागत करतात आणि धर्मांधतेची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आसल्याचे नमुदही करतात. "पंजाब की भाषा और लिपी की समस्या" या लेखात भाषा साहित्य व समाज या विषयावर चर्चा करताना हिंदी उर्दू पंजाबी याभाषा धार्मिक पायावर हिंदू मुस्लीम व शिख समुदायामध्ये कशा विभागल्या जात आहेत आणि या धार्मिक विभागणीच्या पलिकडे गेल्या शिवाय पंजाबच्या भाषा विषयक प्रश्नांचे निराकरण होणार नाही व जनतेची जानीव परिवर्तनवादी होणार नाही याकडे लक्ष वेधतात. वसाहतवादा इतकाच जमातवाद भारताचा शत्रू आहे याची जाणीव ठेवून त्याने लोकांनी धर्म आणि अंधश्रद्धाच्या मानसिक बंधनातून स्वतः ला मुक्त करण्याच्या गरजेवर भर दिला. 

अछूत समस्या या लेखात हिंदुधर्मातील कर्मविपाकाचा सिद्धांत तसेच अस्पृश्यता वर्णव्यवस्था विषम उतरंडीचे केले जानारे समर्थन यावर जोरदार हल्ला केलेला आहे. व या प्रश्नाची क्रांतीकारी राजकारणाशी सांगड घातली आहे समतेच्या तत्त्वाची आठवण देऊन भगतसिंग जन्माधिष्टीत वा सामाजिक श्रमविभागणी च्या आधारे केले जानारे भेदभाव व विषमतेच्या कल्पना याचे उच्चाटन करण्याची मागणी करतात. मदन मोहन मालवीयांसारखी मंडळी सार्वजनीकपणे भंग्याच्या हातुन हार घालून घेत पण घरात शिरण्यापूर्वी कपड्यानीशी आंघोळ करून शुद्ध होत यावर  कडकडून टिका करतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच्या अगदी जवळ जाणारी भगतसिंहांची भुमिका ही त्यावेळी या प्रश्नाचा वर्गीय गाभा, व्यापक क्रांतीशी असलेले या प्रश्नाचे नाते अशा मुद्यावरील त्यांचा भरही स्पष्ट करतात . आंबेडकरी चळवळ व कम्युनिस्ट चळवळ यांना वैचारिक तसेच व्यवहारीक पातळीवर एकत्र आणू शिकणारी बिजे स्फुलिंगे भगतसिंगांच्या मांडणीत दिसतात. 

"क्रांती" या शब्दाला भारतामध्ये ठामपणे समाजशास्त्रीय व आमुलाग्र परिवर्तनकारी पायावर प्रस्थापित करण्याचे श्रेय भगतसिंगांना द्यायला हवे. त्याआधी क्रांतीकारक हा शब्द पुनरुज्जीवनवादी, धार्मिक जमातवादी वा केवळ सशस्त्र कृती करणार्‍या प्रवाहाशी जोडलेला होता. पण भगतसिंगच्या कार्याने त्या शब्दाला या प्रवाहातून तोडून नव्या शास्त्रीय पायावर ठेवले. विचारसरणीच्या पायावर मार्क्सवादी अर्थाने तर राजकीय पातळीवर धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी समाजवादी अशा डाव्या अर्थाने प्रस्थापित केले. 
क्रांतीला केवळ राजकीय अर्थाने न पहाता भगतसिंगांनी संपुर्ण सामाजिक आशयासह मांडले तिला ठोस राष्ट्रीय पायावर उभे करत असतानाच संकुचित राष्ट्रवादाच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरराष्ट्रीय वैश्विक संदर्भासह पुढे ठेवले. 
             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या