आदिवासी बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये न्याय्य समावेश : ऐतिहासिक पुराव्यांची साक्ष!- पांढरे वादळ
आदिवासी बंजारा समाज हा या देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जंगल, डोंगर, तांडे, वाड्या-वस्त्यांवर निसर्गाशी नाते जोडून जगणाऱ्या या समाजाला शतकानुशतके सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर अन्याय सहन करावा लागला आहे. पण आजही न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी या समाजाला चळवळ उभारावी लागत आहे.
हैदराबाद गॅझेटचे ऐतिहासिक महत्त्व
हैदराबाद संस्थानच्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. ज्या पद्धतीने या गॅझेटमधील नोंदींवरून महाराष्ट्रात "मराठा समाजाचा कुनबी म्हणून उल्लेख" पुरावा मानला जात आहे, त्याच तत्त्वावर बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गात स्थान मिळणे ही न्याय्य व ऐतिहासिक गरज आहे.
महाराष्ट्र विभाजनापूर्वीची वस्तुस्थिती
महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात नोंदवला गेला होता. पण राज्य पुनर्रचनेनंतर या समाजाला वंचित ठेवण्यात आले. हा ऐतिहासिक अन्याय दुरुस्त करून महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला एसटीचा लाभ मिळाला पाहिजे.
इतर राज्यातील बंजारा समाज – आधीपासूनच एसटी
आज तेलंगणा (एस टी), आंध्रप्रदेश (एस टी), कर्नाटक (एस.सी.) अशा लगतच्या राज्यांमध्ये बंजारा समाज आदिवासी प्रवर्गात समाविष्ट आहे. या सर्व राज्यांतील बंजारा समाजाशी "रोटी-बेटी व्यवहार" बोलीभाषा एक आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा आजही अखंड सुरू आहे. सगेसोयरे, विवाह-संबंध आणि सांस्कृतिक नाते एकसंध असल्यामुळे एका राज्यात एसटी तर दुसऱ्या राज्यात नाही, हा भेदभाव न्याय्य ठरू शकत नाही. यासाठी बंजारा समाजाने आता आपली कंबर कसली पाहिजे.
समाजजागृतीची संघर्षाची गरज आहे
जर मराठवाडा विभागातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटमुळे एसटीचा लाभ मिळत असेल, तर उर्वरित महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही तोच लाभ मिळायला हवा. अन्यथा समाजात तफावत निर्माण होऊन अन्याय वाढत जाईल. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे या प्रश्नावर जागृती करून लढा दिला पाहिजे.
पांढरे वादळाचे आवाहन!
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, यासाठी कायदेशीर, ऐतिहासिक आणि सामाजिक पुरावे पुरेपूर मजबूत आहेत. आता या चळवळीला समाजबांधवांनी खांद्याला खांदा लावून साथ देणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपणास ठाऊक आहे की, आपण सर्व समाजबांधव समाज म्हणून पांढऱ्या झेंड्याखाली येऊन आपली लढाई उभी केली पाहिजे यात सर्व समाजबांधवांनी आपले योगदान दिले. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे विचार परंतु आपल्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या ताकदीने एकजूट होण्याची गरज आहे. आपण समाज म्हणून पांढऱ्या झेंड्याखाली एकञ आलो तर निश्चितपणे आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आज इतिहास आपल्याला एक सुवर्णसंधी देत आहे. बंजारा समाजाचे हक्काचे स्थान पुन्हा मिळवण्यासाठी, पुढील पिढ्यांना न्याय देण्यासाठी आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने या आंदोलनात सहभागी व्हावे.
आपल्या न्याय्य हक्कासाठी, भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा पांढरे वादळ घोंगावत पांढऱ्या, झेंड्याखाली बंजारा समाज राज्यभर आंदोलन उभारणार आहे.
वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे विचार असले तरी आज पांढऱ्या ध्वजाखाली एकत्र येण्याची वेळ आली आहे. आपल्या एकतेच्या बळावर आपण हा न्याय मिळवू आणि बंजारा समाजाला पुन्हा त्याचे खरे स्थान मिळवून देऊ.


1 टिप्पण्या