चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुपकडून आदर्श वृक्षारोपण

 'चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुपकडून आदर्श वृक्षारोपण



ना गाजावाजा, ना फटाके, ना हारतुरे, ना राजकारण्यांची मांदियाळी, ना कार्यकर्त्यांचा घोळका 


अवघ्या ६ हजारात लावली ८ ते १२ फुटी १५ झाडे; गंगाधरे, सूतनासे, युसूफ़ यांचा सक्रिय सहभाग


बीड प्रतिनिधी :- शहरातील मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ यांच्या 'चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून साधारण दोन महिन्यापूर्वी वर्गणीतून वृक्षारोपण करण्याचे साहित्यिक, कवी अनंत सुतनासे यांनी सुचविले होते. यानंतर ग्रुप ॲडमिन एस.एम.युसूफ़ यांनी ग्रुपमध्ये आवाहन केले. त्याला ग्रुपमधील २९ सदस्यांनी पाठींबा देत वर्गणीतून ६३६५ रुपये जमा केले. यातून चांगली ८ ते १२ फूट उंच झाडांची १५ रोपे खरेदी करण्यात आली. याशिवाय माती आणि पाणीही खरेदी करून टाकण्यात आले. कुठलाही गाजावाजा न करता, फटाके न फोडता, हारतुरे न घेता, राजकारण्यांची मांदियाळी न जमविता, कार्यकर्त्यांचा घोळका न बोलवता अगदी साध्यापणाने 'चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुपकडून आदर्श वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, अनंत सूतनासे, एस.एम.युसूफ़ आणि शीलवंत बाळूभाऊ यांचा सक्रिय सहभाग होता. तर वृक्षारोपणासाठी शेख मज़हरुद्दीन, फैय्याज़ इनामदार, सरफराज़ चौधरी, अनंत सूतनासे, अब्दुल कलाम, ए-१ सायकल, मुस्तफा पठाण, काज़ी मतीन, काज़ी मुनीर, साजिद सलीम, चांँद बेग, शकील बागवान, आबेद पठाण, शेख मोहसीन, जफर खान, बबलू पठाण, संतोष बनकर, महादेव चव्हाण, डब्बू अली (उत्तर प्रदेश), रमेशराव गंगाधरे, शेख सईद, एस.एम.युसूफ़, डॉ. भारती नंदगोली, गोविंदराव सवासे, सफ़र खान, अल्हाज सय्यद लायक़, शेख सलीम, इफ़्तेक़ार तंबोली, अल्ताफ़ शेख (पुणे) या २९ ग्रुप सदस्यांनी वर्गणीतून ६३६५ रुपये जमवत आदर्श वृक्षारोपण केले.


जून २०२३ पासून सुरू होता पाठपुरावा

बशीरगंज ते थोरात वाडी आणि जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय हा रस्ता जवळपास ३० वर्षानंतर व्यंगात्मक निषेध आंदोलन, भीक मांगो आंदोलन व बेशरम आंघोळ आंदोलनानंतर बनविण्यात आला होता. या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात यावी म्हणून हे तिन्ही आंदोलन करणारे एस.एम.युसूफ़ यांनी जून २०२३ सालापासून निवेदनाच्या माध्यमातून, प्रसिद्धी माध्यमाद्वारे बातमीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. परंतु एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही बीड नगर परिषद, जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन (या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गृह विभागाची अर्थातच पोलीस प्रशासनाची जागा असल्याने) या तिघांपैकी कोणीही वृक्षारोपण केले नाही. तिन्ही विभागाकडून निराशाच हाती लागल्याने शेवटी 'चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी आवाहन केल्यानंतर शासन-प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य किंवा मदत न घेता येथे १५ झाडे स्वखर्चाने लावण्यात आली आहेत


समस्या गंभीर गांभीर्य मात्र कुणालाच नाही!

वाढत्या मानवी वसाहती, सिमेंट काँक्रीट ची जंगले निर्माण करण्यासाठी नैसर्गिक देण असलेली झाडे सर्रासपणे तोडून/कापून टाकण्यात येत आहे. सद्यस्थितीत एका सर्वेक्षणानुसार आपल्या भारत देशात असलेल्या सध्याच्या जनसंख्येनुसार थोडीथोडकी नव्हे तर चक्क ५०० हजार कोटी झाडांची कमतरता आहे. याकडे जनतेसह शासन-प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी आणि राजकारण्यांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने सजीव सृष्टीला लागणारे ऑक्सिजन आता यापुढे सहजासहजी मिळणार नाही. वेगवेगळ्या सबबीखाली झाड तोडणे आणि न लावणे यामुळे जमिनीची धूप थांबणार नाही. या गंभीर समस्येचे गांभीर्य मात्र कुणालाच असल्याचे दिसत नाही.




शासकीय वनसंरक्षक विभाग फक्त मिशांवर ताव मारणारे?

या रस्त्यावर झाडे लावण्यासाठी वनसंरक्षक कार्यालयाच्या रोपवाटिकेत जाण्याचा अनुभव आला. तिथे गेल्यानंतरचा अनुभव एकदम वाईट होता. खाजगी रोपवाटिकांमध्ये ज्याप्रमाणे जाड आणि उंच झाडे उपलब्ध आहेत, त्या तुलनेत शासकीय वनसंरक्षक विभागाकडे झाडे औषधालाही नाहीत. करंगळी पेक्षा बारीक रोप आणि फूट ते दोन फूट उंच असलेली रोपटे त्यांच्याकडे आहेत. जे कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर लावली जाऊ शकत नाहीत. ही बाब वनसंरक्षक कार्यालयातील मिशांवर ताव मारणाऱ्या चपराशापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत कोणाच्या खिजगणतीतच नसल्याचे दिसले. त्यांच्याकडे रोपे घेण्यासाठी गेलेल्यांना ते डोळे वटारून कायदा आणि नियम शिकवितात परंतु जेव्हा जाड आणि उंच झाडांची रोपे हवी असल्याचे म्हटले की, त्यांचे खांदे खाली पडतात, मान आणि डोळे नकारात्मक हलवून खाली जातात. अशी अवस्था शासकीय वनसंरक्षक विभागाची असल्याचे दिसून आले. ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. याची जेवढी निंदानालस्ती करावी तेवढी कमीच आहे. हे खेदाने नमूद करावेसे वाटते. असे एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या