रेल्वेचे तिकीट अर्ध्याने झाले कमी,बीडच्या प्रवाशात आनंदाचे उधाण?
बीड प्रतिनिधी :- भारतीय रेल्वेने नुकतेच रेल्वेचे तिकीट दर अर्ध्यावर आणल्याचे जाहीर केल्याने देशातील इतर भागापेक्षा बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशात आनंदाचे उधाण आल्याची चर्चा चेष्टेने केली जात आहे.
या चर्चे मागचे कारण म्हणजे निज़ाम काळापासून बीड जिल्हावासी परळी-बीड-अहेमदनगर या रेल्वे मार्गाची वाट पाहून आहे. गेल्या काही वर्षात पहिल्या टप्प्यात अहेमदनगर ते आष्टी व दुसऱ्या टप्प्यात आष्टी ते अंमळनेर अशी रेल्वे लाईन टाकण्यात आली. कालच म्हणजे दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आष्टी ते अंमळनेर या रेल्वेला ऑनलाईन हिरवा झेंडा दाखविला आणि या मार्गाची चाचणी झाली. आता अहमदनगर ते अमळनेर ही रेल्वे काही दिवस चालविली जाईल. असे असले तरी जोपर्यंत अहेमदनगर ते परळी पर्यंत पूर्ण रेल्वे मार्ग जोडला जात नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही. कारण पहिल्या टप्प्यात अहेमदनगर ते आष्टी सुरू करण्यात आलेल्या डेमो रेल्वेला दररोज फक्त चार प्रवासी मिळत होते. पाचवा प्रवासी काही मिळाला नाही. यामुळे या मार्गावरील रेल्वे बंद करावी लागली होती. आता पुन्हा अंमळनेर पर्यंत रेल्वे लाईन टाकण्यात आल्याने अंमळनेर पर्यंतही चाचणी म्हणून काही दिवस रेल्वे सुरू ठेवली जाईल. तिथेही प्रवासी भेटले नाही तर ती पुन्हा बंद केली जाईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यव्यत्त्याची गरज नाही. एवढेच नाही तर पुढच्या टप्प्यात अंमळनेर ते बीड ही रेल्वे लाईन ही सुरू केली तरी त्याला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. कारण बीड शहरातून अहेमदनगर ला जाणारे प्रवासी जास्त संख्येत नसतात व अहेमदनगरहून बीडला येणारे प्रवासीही जास्त नसतात. जोपर्यंत पूर्वीचे रेल्वे मार्ग म्हणजेच परळी-अहेमदनगर एक दुसऱ्याशी जोडले जाणार नाहीत तोपर्यंत अहेमनगरहून रेल्वे बीड पर्यंत आली तरीही उपयोगाचे नाही. ती परळी पर्यंत जोडली गेलीच पाहिजे तेव्हाच या मार्गावर रेल्वेला प्रवासी चांगल्या संख्येत भेटू शकतात असो! हा झाला फक्त बीड जिल्ह्यापुरता रेल्वेचा विषय.
भारतीय रेल्वेने कोरोना काळात सर्व प्रकारच्या रेल्वे तिकिटाचे दर वाढविले होते. शिवाय अनेक योजनांना व तिकीट सवलतींना सुद्धा कात्री लावली होती. आता तिकीट दर कपातीचा निर्णय घेण्यात आला असून पॅसेंजर रेल्वेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पॅसेंजरच्या तिकीट दरात ४० ते ५० टक्के कपात झाली आहे. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय पॅसेंजर ट्रेन ला लागू असणार आहे. कोरोना काळात तिकिटाचे दर दुप्पट करण्यात आले होते. त्यानंतर आता करण्यात आलेली ही कपात प्रवाशांना दिलासा देणारी आहे. रेल्वेने घेतलेला हा तिकीट दर कपातीचा निर्णय सर्वच एक्सप्रेस, स्पेशल आणि मेमू ट्रेन साठी लागू राहणार आहे. रेल्वेने काढलेल्या अधिसूचनेनुसार मेन लाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ट्रेन आणि झिरो क्रमांक पासून सुरू होणाऱ्या सर्व पॅसेंजर रेल्वेच्या तिकीटात ५० टक्क्यांपर्यंतची कपात करण्यात आली आहे तर अनारक्षिस तिकीट प्रणाली ॲपच्या किरायात सुद्धा बदल करण्यात आला आहे. पूर्वी पॅसेंजर ट्रेन व नंतर एक्सप्रेस स्पेशल आणि मेमू ट्रेन या नावाने असलेल्या देशभरातील सर्व ट्रेनसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी कोरोना मधील लॉक डाऊन मध्ये रेल्वेने त्यांच्या सर्व रेल्वे बंद केल्या होत्या. लॉकडाऊन नंतर हळूहळू रेल्वेची सेवा पूर्वपदावर आली असून सुद्धा जनतेला वाढीव तिकीटदराचा फटका सहन करावा लागत होता परंतु आता घेण्यात आलेल्या तिकीट दर कपातीच्या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळणार असला तरी बीड जिल्हावासियांना रेल्वेचा दिलासा कधी मिळेल? असा प्रश्न पुन्हा एकदा रेल्वेच्या या तिकीट दर कपातीमुळे बीड जिल्ह्यात उपस्थित होऊ लागला आहे.


0 टिप्पण्या