प्रवाशांना एसटी बसचे गांभीर्यच राहिले नाही शासनाकडून सवलतींचा मारा तर कर्मचाऱ्यांचा मात्र दिलहारा!

 प्रवाशांना एसटी बसचे गांभीर्यच राहिले नाही

शासनाकडून सवलतींचा मारा तर कर्मचाऱ्यांचा मात्र दिलहारा!

बीड जिल्हा प्रतिनिधी :- वृद्ध, वयस्कर, दिव्यांग यांच्यानंतर  आता शासनाने महिलांनाही एसटी प्रवास भाड्यात ५०% टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असला तरी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी बसचे गांभीर्यच राहिले नसल्याचे नुकतेच बीड  एसटी स्टँडवर दिसून आले. या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात येत असलेल्या सवलती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या दिलहारा व्यवहारामुळे आगामी काळात एसटी महामंडळाच्या बसेस म्हणजे दारिद्र्य रेषेखालील प्रवाशांच्या बसेस अशी ओळख होऊन आज आहे त्यापेक्षा वाईट अवस्थेत एसटी बसेस ची अवस्था झाली नसल्यासच नवल असे मत मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे. 
             याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आजकाल एसटीच्या प्रवाशांना एसटी बसचे गांभीर्यच राहिले नाही.
त्यात पुन्हा शासनाकडून सवलतींचा मारा केला जात आहे. तर कर्मचाऱ्यांचा दिलहारा वावर असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस सोबत स्पर्धा करत तसेच राज्य शासनाकडून प्रवाशांना वेळोवेळी देण्यात येत असलेल्या अनेक सवलतींमुळे अगोदरच एसटी महामंडळ आणि एसटी बसेस पार डबघाईस आले आहे. असे असतानाच नुकतेच राज्य शासनाने महिला प्रवाशांसाठी प्रवास भाड्यात ५०% सवलतीचा अजून एक निर्णय जाहीर केला आहे. आतापर्यंत एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये असलेल्या वयस्कांना ६० वर्षे वयानंतर अर्धे तिकीट तर वयाची ७५ वर्षे पार केलेल्यांना पूर्णतः मोफत, दिव्यांगांना एक चतुर्थांश तर त्यांच्यासोबत असलेल्या मदतनिसास ५०% सवलत अशा काही ठळक सवलती लागू आहेत. यात पुन्हा आता शासनाने महिलांनाही प्रवास भाड्यात ५०% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटी महामंडळावर निश्चितपणे अजून जास्तीचा आर्थिक भार पडणार आहे. मात्र याचे गांभीर्य एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांनाही असल्याचे दिसत नाही. यामुळेच की काय खाजगी ट्रॅव्हल्सच्या मानाने एसटी बसेस या साफसफाई मध्ये पासंगाला ही पुरणार नाही अशी अवस्था एसटीच्या बसेसची आहे. दिसायला भंगार, खुळखुळ्या सारखे झालेल्या, चालता-चालता कधी बंद पडतील याचा नेम नसलेल्या, एसटी महामंडळाच्या अनेक बसेस आजही रस्त्यांवरून धावताना सहज नजरेस पडतात. एसटीच्या बसेसची ही अवस्था का आहे ? याचा विचार शासनकर्ते, प्रशासन, एसटी महामंडळ, कर्मचारी, प्रवासी कधी गांभीर्याने विचार करत असतील असे दिसत नाही. म्हणूनच जिथे खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसेस आतून बाहेरून चकाचक दिसतात. तिथे एसटीच्या बसेस मात्र बाहेरून भंगार तर आतून उकिरड्यासारख्या दिसून येतात. पाण्याने आतून बाहेरून बसेस धुणे तर महामंडळ विसरले की काय  असा प्रश्न पडतो. कारण बस मध्ये गुटखा, तंबाखू, पान खाऊन सीटच्या कोपऱ्याला थुंकलेले हमखास दिसते तर शिड्यांवर व खिडकीच्या बाहेरून अनेकदा उलट्या केलेल्याही आढळतात. तरीसुद्धा अशा एसटी बसेस ची साफसफाई केली जात नाही. एसटी महामंडळाकडून फक्त बस सुटण्याची वेळ झाली की ती प्लॅटफॉर्मवर आणून लावली जाते आणि बस आहे त्या स्थितीतच त्याच्यात प्रवासी कोंबून चालक-वाहक बस घेऊन जातात. त्यात पुन्हा प्रवासी खचाखच भरलेले असेल तर अशा वेळेस उभ्या असलेल्या महिला व मुलींना जागा देण्याचे सौजन्यही बस मधील सीटवर बसलेले प्रवासी दाखवत नसल्याचे अनेकदा दिसते. ही बाब या बातमीसोबत टाकत असलेल्या फोटोकडे बघून स्पष्टपणे अधोरेखित होते. ज्यात एक वयोवृद्ध महिला सीट उपलब्ध नसल्याने एसटी बसच्या दरवाजाच्या आतून पायऱ्यांच्यावर बसलेली दिसते तर त्याच वृद्ध महिलेच्या पाठीमागे व चालकाच्या बाजूस केबिनमध्ये असलेल्या सीटवर एक तरुण अक्षरशः एसटी बसची विटंबना केल्यासारखे ऐसपैस टांगा फाकवून, दोन्ही टांगा बसच्या काचांकडे ठेवून आपण फार मोठे रुस्तुम ए हिंद असल्याचा आविर्भावात  प्रवास करत असल्याचे आपण पाहू शकतात. या प्रवाशाच्या भावमुद्रेला अशा अवताराला संबंधित बसचा चालक सुद्धा कुठल्याही प्रकारची आडकाठी आणत नसल्याचे दिसत आहे. प्रवाशांच्या अशा बेजबाबदारपणामुळे, चालक-वाहकासह इतर कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच विहिरीत नसतानाही पोहऱ्यात आल्याचे भासवून वेगवेगळ्या सवलतींचा मारा एसटी महामंडळावर शासन करत असल्याने पुढे चालून एसटी महामंडळाची यापेक्षा जास्त दुर्दशा झाल्यास नवल नसणार आणि पुढे चालून एसटी बसेस या फक्त दारिद्र्य रेषेखालील प्रवाशांसाठी असल्याचा समज न झाल्यास नवल असे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या