महाराष्ट्रातील माळेगाव जिल्हा नांदेड तालुका लोहा येथील, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणारी खंडोबाची यात्रा महोत्सव आयोजित.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती यन्नावार :- माळेगाव येथील खंडोबाचे हेमाडपंती स्थापत्यशैलीच्या मंदिराच्या सभोवताली मोठे आवार असुन,मंदिराला दगडी महाद्वाराच्या बाजूला छोटा बुरूज व मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरले आहेत.गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत.
निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.
महाराष्ट्रातील खंडोबाच्या यात्रे पेक्षा माळेगावच्या खंडोबाची यात्रा मोठी असून,महाराष्ट्रासह आंध्र,कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांच महेर समजलं जातं, या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी,गोंधळय़ांची गाणी,वारू नाचविणे,आराध्यांची गाणी,ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ,संगीत बारी याशिवाय,बहुरूपी रायरंद,वासुदेव, स्मशान जोगी,मरीआईवाले,अशा विविध लोककलावंतांच्या कलांचे दर्शन या यात्रेत होते.खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते.देव स्वारीची गावातून पालखी निघते.
रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो.रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० किलो मीटर अंतरावर असून.या घराण्यातील नागोजी नाईकाने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केल्यामुळे,इसवीसन १८०९ मध्ये नाईकांना पकडून कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे.नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते.वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.
माळेगावच्या यात्रे निमित्त, गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत.यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री,शर्यती,प्रदर्शन,कुस्त्यांची दंगल,लोककला, संगीत वाद्य,लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने भरणारी माळेगावची यात्रा सध्या पाच दिवस भरते.
भटक्या जमातींच्या गोसावी,गारुडी,घिसाडी,जोशी, कोल्हाटी,मसणजोगी,नंदीवाले,पांगुळ,वासुदेव,वैदु आदी भटक्या व विमुक्ताच्या.जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो.या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे,गुन्हे,कौटुंबिक प्रश्न,देवाणघेवाण,सोयरीकी इत्यादी गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते.
माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृती उपासकांची यात्रा होय.

.jpeg)
.jpeg)
0 टिप्पण्या