चाँद बीबी महाल येथे पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करा - एस.एम.युसूफ़

चाँद बीबी महाल येथे  पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करा - एस.एम.युसूफ़

बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अहमदनगर येथील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन

बीड जिल्हा प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक चाँद बीबी चा महाल येथे पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करून देण्याची मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि सय्यद अल्ताफ यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अहमदनगर चे
जिल्हाधिकारी, पुरातत्त्व अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पीडब्ल्यूडी/बी.अँड सी. चे विशेष कार्यकारी अभियंता, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. 
        याविषयी जबाबदार अधिकाऱ्यांना पाठवलेल्या  निवेदनात केले आहे  की, अहमदनगर मधील ऐतिहासिक चाँद बीबी का महाल रस्ता डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरणाने बनविण्यात यावा. मुख्य रस्त्यापासून ते महालापर्यंत असलेला रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत असून रस्त्याला जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. एक मीटर रस्ता सुद्धा चांगल्या स्थितीत राहिला नाही. डोंगर माथ्यावर असलेला हा रस्ता अत्यंत धोकादायक वळणांनी व्यापलेला आहे. त्यात पुन्हा रस्त्याची चाळणी झाल्याने वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.
अष्टकोनी तीन मजली महालाच्या प्रत्येक कमानीला आतून बाहेरून संरक्षक लोखंडी जाळ्या लावणे अत्यंत आवश्यक आहे. येथे असलेल्या असंख्य कमानी मधून सध्या फक्त एकच कमानीला संरक्षक जाळी लावलेली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कमानीला आतून बाहेरून जाळ्या लावणे आवश्यक आहे.
महालाचा प्रत्येक मजला पर्यटकांसाठी खुला करणे आवश्यक असून या ऐतिहासिक स्थळावर आलेल्या पर्यटकांना शेवटच्या मजल्यापर्यंत जाऊन या पर्यटन स्थळात आल्याचा आनंद घेता यावा याकरिता पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या जिन्याच्या दारावर लावलेले कुलूप खुले करणे आवश्यक आहे.
महालाच्या तळघरात महालाचे निर्माणकर्ते सलाबत खान व त्यांच्या पत्नीच्या कबरींवर अक्षरशः अंधाराचे काळोख आहे. कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना कबरी तर दिसत नाहीतच शिवाय एक दुसऱ्यांनाही पाहता येत नाही. एवढा अंधार तिथे आहे. यामुळे पर्यटकांना कबरीचे दर्शन घेता येत नाही. हे पाहता कबरींवर लाईट्स लावणे अत्यंत आवश्यक आहे.
महाल परिसरात सुद्धा  आवश्यक प्रमाणात विद्युत खांब लावणे आवश्यक आहे जेणेकरून दिवस मावळल्यानंतरही इथे आलेल्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल.
महालावर येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे पाण्याची सोय नाही. यामुळे तहानलेल्या पर्यटकांसाठी येथे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे ही अत्यंत आवश्यक आहे.
                 या सर्व बाबींचा  निवेदनात उल्लेख केला असून जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन या सर्व बाबींवर आपापल्या पातळीवर आवश्यक ते सर्व कार्य करून चाँद बीबी का महाल एक परिपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून तयार करून पर्यटकांच्या सेवेत द्यावे. अशी मागणी करत आपला ऐतिहासिक ठेवा जतन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असेही मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि सय्यद अल्ताफ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या